माउली भंडाऱ्यात न्हाली… वैष्णवांची मने आनंदली…खंडेरायाच्या जेजुरीत माउलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे आगमन होताच पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. यामुळे माउलींच्या पालखी रथाला सोनेरी झळाळी आली. विठ्ठलाच्या नामघोषाबरोबरच वारकरी बांधवांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जय घोष केल्याने सारे वातावरण भक्तिमय झाले. लांबूनच खंडोबा गड पाहताच वारकऱ्यांमध्ये चैतन्य संचारले. टाळ-मृदुंगाच्या गजरात खंडोबाची पारंपरिक गाणी दिंड्यातून ऐकू येऊ लागली.

अहं वाघ्या सोहम वाघ्या प्रेमनगारा वारी ॥

सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी ॥

मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी ॥

अशी गाणी, अभंग, भारुडे म्हणत वारकऱ्यांनी मल्हारी वारी मागितली. खंडोबा देव अठरापगड जातींचं दैवत आहे. त्याला शंकराचा अवतार मानतात. खंडोबा व पंढरीचा विठोबा या दोन्ही दैवतांच्या भक्तिरसात सारे जण न्हाऊन निघाले. संत सोपानकाकांच्या सासवड नगरीतून रविवारी सकाळी सहा वाजता पालखीने जेजुरीकडे येण्यासाठी प्रस्थान ठेवले. वाटेत बोरावके मळ्यात सकाळची न्याहारी व यमाई शिवरीत भोजन उरकून पालखीने सासवड ते जेजुरी हा १७ कि.मी चा टप्पा पार केला. सोहळ्याने सायंकाळी पाच वाजता जेजुरीत प्रवेश केला. या वेळी पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत, जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपाध्यक्ष गणेश निकुडे, मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, पुणे धर्मादाय सहआयुक्त सुधीर बुके, मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त तुषार सहाणे, विश्वस्त ॲड. प्रसाद शिंदे, अशोक संकपाळ, पंकज निकुडे यांनी पालखीचे स्वागत केले.

खंडोबा गडावर दर्शनासाठी प्रचंड गर्दी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याबरोबर आलेल्या हजारो वारकरी बांधवांनी खंडोबा गडावर दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. पहाटेपासून खंडोबाच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. दुपारी सारा गड वारकऱ्यांच्या आगमनाने फुलून गेला. वारीमध्ये चालून पाय दुखत असले, तरी त्याची पर्वा न करता चारशे पायऱ्यांचा गड चढून आलेल्या वारकरी बांधवांचा उत्साह दांडगा होता.

पंढरीत आहे रखुमाबाई, येथे म्हाळसा बाणाई

तिथे विटेवरी उभा, येथे घोड्यावरी शोभा

तेथे बुक्क्याचे लेणे, येथे भंडार भूषणे अशा भोळ्या भावाने गायलेल्या भक्तिगीतांमधून वारकऱ्यांमधील भक्तिप्रेमाचे उत्कट भाव जाणवत होते. महिलांनी एकमेकीच्या अंगावर भंडारा उधळून आनंद लुटला. खंडोबाच्या दर्शनामुळे त्यांचा थकवा निघून गेल्याचे चित्र गडावर पाहावयास मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.