रेमडेसिविर इंजेक्शनच्या अतिवापरामुळे कोरोना रुग्णांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या पाहता आता पुण्यातील रुग्णालयांना महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णाला (Coronavirus) अगदीच गरज असेल तरच या इंजेक्शनचा वापर करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे नसतील किंवा त्याला रेमडेसिविरची एलर्जी असेल तर त्यांना इंजेक्शन देऊ नये. तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणि एखादा अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठीही रेमडेसिविरचा वापर टाळावा, अशा पुणे (Pune) सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय, कोणत्याही रुग्णालयाने रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी नातेवाईकांना प्रिस्क्रिप्शन देऊ नये. गरजू रुग्णांनाच रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जावे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित रुग्णालयाचा रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा रोखण्यात येईल, असा इशाराही पुणे महानगरपालिकेने दिला आहे.
पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी, ‘बालरोग तज्ज्ञां’चा टास्क फोर्स स्थापन होणार
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना विषाणूची लागण होण्याचा धोका ओळखून पुणे महानगरपालिकेने युद्धपातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी आता ‘बालरोग तज्ज्ञां’चा टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे.येरवाडा येथील राजीव गांधी रुग्णालयात लहान मुलांसाठी 50 बेडचा स्वतंत्र कक्ष उभारण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी निधी दिला आहे.