पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत असला तरी रुग्णसंख्येतील वाढ अजूनही हजाराच्या घरात आहे. त्यामुळे पुणे प्रशासनाने पुण्यातील लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 12 नंतर पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
मंगळवारपासून पुण्यातील लॉकडाऊन कडक करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडावं, असं आवाहन पुणे पोलिसांनी केलंय. दुपारी 12 वाजल्यानंतर रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी केली जाणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे पोलिसांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.
पुणे शहरात आज दिवसभरात 1 हजार 165 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 4 हजार 10 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आज 74 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 23 जण पुण्याबाहेर असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिलीय. पुण्यात सध्या 1 हजार 402 गंभीर कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर पुणे शहरात सध्या 30 हजार 836 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
तिसऱ्या लाटेपूर्वीच पुण्यात लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या वर्षभरातील आकडेवारी पाहिली तर पुण्यात गेल्या वर्षभरात सव्वा दोन लाख बालकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात 1 वर्षाखालील 249 चिमुकल्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय.
दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, असेही निर्देश सरकारने दिले आहे. या निर्देशानंतर अनेक ठिकाणी चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहे.