कल्याणमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट आधी पॉझिटिव्ह येतो. त्यामुळे त्याला महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. ती व्यक्ती जवळपास सात दिवस महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन राहते. त्या व्यक्तीला कोणतेही लक्षणे नव्हते. मात्र, तरीही खबरदारी म्हणून डॉक्टरांकडून औषधे दिली जातात. पण अचानक त्याला मोबाईलवर एक मेसेज येतो. हा मेसेज राज्य सरकारच्या एक वेबसाईटचा असतो. त्या वेबसाईटवर त्याचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं असतं. मात्र, तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं. कारण ती व्यक्ती सात दिवस क्वारंटाईन राहिलेली असते. दुसरीकडे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं.
कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात राहणारे रुपचंद चौधरी (वय 35) यांच्यासोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. रुपचंद यांच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या घरात वडिलांना बाधा झाल्याने घरातील इतर सदस्यांनी देखील खबरदारी म्हणून कोरोनाची चाचणी केली. त्यांची आई, भाऊ आणि वहिणी यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. तर त्यांचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांनी महापालिकेतच कोरोनाची चाचणी केली होती. आधी त्यांनी अँटिजेन टेस्ट केलेली. त्यात त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला. नंतर त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट केलेली. यामध्ये रुपचंद यांच्या व्यतिरिक्त इतर कुटुंबियांचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो.
रुपचंद यांचे वडिल हे कल्याणच्या खळकपाडा जवळील वसंतवॅली कोविड सेंटरमध्ये दाखल होते. त्यांना दररोज घरुन जेवणासाठी डब्बा जायचा. मात्र, रुपचंद यांचाही कोरोना रिपोर्ट महापालिकेकडून पॉझिटिव्ह देण्यात आल्याने कुटुंबियांची प्रचंड ससेहोलपट झाली. रुपचंद यांना महापालिकेने टाटा या कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन केलं. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वडिलांची चिंता होती. याशिवाय त्यांच्या कुटुंबियांना देखील त्यांची चिंता होती.
रुपचंद यांनी 27 मार्चला कोरोनाची चाचणी केलेली. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांना कोरोनाचा रिपोर्ट मिळाला. त्यांना त्याच दिवशी पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. तिथे दाखल होऊन सहा दिवस झाल्यानंतर 4 एप्रिलला त्यांना मोबाईलवर एक मेसेज प्राप्त झाला. या मेसेजमध्ये एक लिंक होती. हा मेसेज रुपचंद यांनी दुसऱ्या दिवशी बघितला. संबंधित लिंक वर त्यांनी क्लिक केलं तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यात त्यांचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह असल्याचं म्हटलं होतं.