आज दि.११ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

राज्यातील लॉकडाऊन 30 मे
पर्यंत वाढवला जाऊ शकतो

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन अजून वाढवण्याचे संकेत मिळत आहे. राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती मिळतेय. राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येतील वाढ अद्याप कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. राज्यात 30 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू शकतो असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.

पालक गमावलेल्या बालकांच्या
संगोपनसाठी उपाय

कोविड-१९ आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क) फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय आज महिला व बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. काही प्रसंगी कोविड-१९ या रोगामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ मुलांची गंभीर समस्या झाली आहे.

बस्तर क्षेत्रात 400 नक्षलवाद्यांना
कोरोनाची लागण !

छत्तीसगडमधील नक्षल दलमच्या अनेक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बस्तर क्षेत्रात 400 नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. तर 10 नक्षलवाद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोरोनावरील उपचारांसाठी नक्षलवाद्यांना जंगलाबाहेर येऊन उपचार घेणं गरजेचं बनलं आहे.

आंध्रप्रदेशात ऑक्सिजनचा पुरवठा
विस्कळीत 11 जणांचा मृत्यू

ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने एका सरकारी रुग्णालयात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील रुईया रुग्णालयात ही घटना घडली. या दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, असे आदेश मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी दिले.

ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात
8 महिलांचा समावेश

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 43 मंत्र्यांचं जम्बो मंत्रिमंडळ स्थापन केलं आहे. या मंत्रिमंडळात नव्या-जुन्या आमदारांचा समावेश करतानाच एम फॅक्टरलाही विशेष स्थान देण्यात आलं आहे. त्यानुसार मंत्रिमंडळात 7 मुस्लिम आणि 8 महिलांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता सरकारमधील 43 मंत्र्यांना आज पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीला
पश्चिम बंगालमध्ये क्रीडामंत्री

क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या खेळपट्टीवर प्रवेश केलेला माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीला पश्चिम बंगालमध्ये क्रीडामंत्री होण्याचा बहुमान मिळाला आहे. सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांनी सोमवारी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यात तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) 43 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात मनोज तिवारीचेही नाव आहे.

बंगालमधील सर्व आमदारांसाठी
संरक्षण देण्याचा निर्णय

निवडणुकीनंतर होणाऱ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाचे पथक बंगालमध्ये विविध ठिकाणांचा दौरा करून आढावा घेत आहे. नंदिग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभव करणार्या सुवेंदू अधिकारी यांची विधिमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बंगालमधील सर्व आमदारांसाठी संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यानसुद्धा भाजपच्या उमेदवारांवर हल्ले झाले होते. त्यानंतर जवळपास सर्वच उमेदवारांना संरक्षण पुरविण्यात आले होते.

भारतीय अन्न महामंडळाची
औरंगाबाद, अमरावतीला कार्यालय

भारतीय अन्न महामंडळाची दोन विभागीय कार्यालये औरंगाबाद आणि अमरावती येथे तातडीने कार्यान्वित होत आहेत. ही कार्यालये मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ क्षेत्रांसाठी सेवा पुरविणार आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. यामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील शेतकरी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे लाभार्थी, संस्था, सरकारी संस्था आणि ग्राहक यांना मोठा लाभ मिळेल.

दक्षिण अरबी समुद्रात
आणखी एक चक्रीवादळ

दक्षिण अरबी समुद्रात आणखी एक चक्रीवादळ येत्या १५ मे च्या आसपास येण्याची शक्यता आहे. तशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. हे चक्रीवादळ दक्षिण अरबी समुद्रात आल्यानंर त्याचा प्रवास उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे १४ मे रात्री पासून केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

म्युकरमायकोसीस आजाराच्या
जाणीव जागृतीसाठी मोहीम

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जाणीव जागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. श्री. टोपे यांनी सांगितले, ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे.

Google Map द्वारे बेड ऑक्सिजनच्या
स्थितीची माहिती मिळणार

सध्याच्या परिस्थितीत भारतात कोविड रुग्णांची संख्या उच्चांकावर आहे. या परिस्थितीत सगळे जण आपापल्या परिने मदतीसाठी पुढे येत आहेत. गुगलच्या Google Map मध्ये नव्या महत्त्वाच्या फिचरची चाचणी सुरू करण्यात आली आहे. Google Map द्वारे युजर्स रुग्णालयातील बेड आणि ऑक्सिजनच्या स्थितीची माहिती मिळवू शकणार आहेत. सोबतच वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा आणि स्थानाची माहितीही मिळवू शकणार आहेत.

लसीचे पेटंट काढून घेतल्याने
सर्वत्र लस पुरवठा होईल

अमेरिकेने कोरोना साथीच्या आजारात लसीचे पेटंट काढून घेण्याचे तत्वतः मान्य केले आहे. त्यामुळे जगात सर्वत्र लस पुरवठा होऊन कोरोनापासून लवकरच सुटका होण्याची आशा आहे. परंतु जर पेटंट काढून टाकले गेले नाही तर जगभरात लसींचा तुटवडा होईल. अनेक श्रीमंत देश पेटंट काढण्याच्या बाजूने नाहीत. जगातील अनेक देशांनी मात्र पेटंट काढण्याचे समर्थन केले आहे.

डॉक्टर नसल्यास बेड आणि
वॉर्ड वाढविण्याने काय फायदा

देशाची राजधानी नवी दिल्लीत कोरोनाचा कहर वाढत असताना आता उपचारासाठी डॉक्टरांच्या कमतरतेवर दिल्ली हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुरेसे डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी नसल्यास बेड आणि वॉर्ड वाढविण्याने काय फायदा होणार ? असा सवाल करत कोर्टने सरकारला सुनावले आहे. द्वारका भागातील इंदिरा गांधी रुग्णालयात नव्याने समर्पित कोविड सुविधेत पुरेसे वैद्यकीय कर्मचारी नसल्यामुळे कोर्टाने ही टिप्पणी केली आहे.

बिहारमधील पप्पू यादवला अटक

बिहारमधील मधेपुरा लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि जन अधिकार पार्टीचे नेते पप्पू यादव यांना अटक करण्यात आली आहे. पाटणा पोलिसांनी ही कारवाई केलीय. पप्पू यादवविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पप्पू यादव यांनी भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या गावाजवळ डझनभर अॕम्बुलंन्स पकडल्या होत्या. खासदार निधीतून या सर्व अॕम्बुलंन्स खरेदी केल्या होत्या. पप्पू यादव यांच्यावर सरकारी संपत्तीचं नुकसान करणं आणि कोव्हिड नियमांचं उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा विषय
गांभीर्याने नाही घेतला

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे प्रचंड आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळण्यात अपयश आल्याने आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा द्यावाच, परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. मेटे यांनी पहिल्यांदाच मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले.

तरुणीला एकाच वेळी
लसीचे सहा डोस दिले

तरुणीला एकाच वेळी Pfizer BioNTech लसीचे सहा डोस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २३ वर्षीय तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात तरुणीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. यानंतर तरुणीला डिस्चार्ज देण्यात आला. इटलीमध्ये ही घटना घडली आहे.

नाशिककरांना संभ्रमावस्थेत
ठेवण्याची जणू स्पर्धाच

नाशिकचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि त्यात भर म्हणजे एफडीए काही अधिकारी या सर्वांनी मिळून नाशिककरांना जास्तीत जास्त संभ्रमावस्थेत कोण ठेवतो याची जणू स्पर्धाच सुरू केलेली आहे. कोरोनाचे रुग्ण मागील सहा दिवसात आज पर्यंत ६००० वरून १५०० पर्यंत कमी होत असताना आता २३ तारखेपर्यंत लॉकडाऊन व त्यात सर्व उद्योग बंद ही भूमिका अनाकलनीय असल्याची टीका भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी केली आहे.

पुण्यातील लॉकडाऊन अधिक
कडक करण्याचा निर्णय

पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत असला तरी रुग्णसंख्येतील वाढ अजूनही हजाराच्या घरात आहे. त्यामुळे पुणे प्रशासनाने पुण्यातील लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेतलाय. 12 नंतर पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.