अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला यंदा कांद्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. किमान कांदा विकून तरी दोन पैसे मिळतील अशी आशा शेतकरी करत आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या बाजाराकडे नजरा आहेत. अशातच कांदा दराबाबत काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. कांदा पीक कोरोनामुळे तब्बल 1 महिना उशिराने कांदा खरेदी सुरू झाली. त्यानंतरही नाफेडचे 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण आले. यामुळे 1 ऑगस्टपासून नाफेडची कांदा खरेदी बंद झाली. त्यानंतर कांद्याच्या सर्वसाधारण दरात 100 रुपयांची घसरण पाहायला मिळालीय.
केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयांतर्गत कांद्याच्या बाजारभावात देशांतर्गत वाढ झाल्यास कांद्याच्या बाजार भावावर नियंत्रण आणलं जातं. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कृषी किंमत स्थिर निधी अंतर्गत यंदा 2 लाख मेट्रिक टन कांद्याचे खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. मात्र, राज्यात कोरोनाची एप्रिल आणि मे महिन्यात दूसरी लाट सुरु झाल्याने तब्बल 1 महिना लेट कांद्याची खरेदी सुरु करण्यात आली. यामुळे कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र, लासलगावसह अनेक ठिकाणी नोडल एजन्सीज मार्फत कांद्याची खरेदी केल्याने 31 जुलैपर्यंत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले.
नाफेडचे कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने नाफेडकडून पुढील कांद्याची खरेदी थांबवण्यात आली आहे. कांद्याची खरेदी बंद झाल्यानं लासलगाव बाजार समिती गेल्या 5 दिवसात सर्वसाधारण कांद्याच्या दरात 100 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. नाफेडची खरेदी सुरु असेपर्यंत व्यापारी प्रति क्विंटल 1750 रुपयांपर्यंत बाजार भावाने कांद्याची खरेदी करत होते. आज (5 ऑगस्ट) मात्र त्याच कांद्याला 1650 रुपयांपर्यंत सर्वसाधारण दराने खरेदी सुरू झाली. त्यामुळे येणाऱ्या दिवसात कांद्याच्या बाजारभावात आणखी घसरण होते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. (फोटो क्रेडिट गुगल)