ज्या ठिकाणी निर्बंधामध्ये शिथिलता द्यायची त्या ठिकाणी ही शिथिलता दिली आहे. पण याचा अर्थ कोणी लाडका आहे आणि कोणी दुश्मन आहे असं नाही, असं सांगतानाच राज्यातील नागरिकांनो आणि व्यापाऱ्यांनो संयम सोडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. जिथे जिथे लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता देऊ शकलो नाही तिथल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती करतो की कृपया संयम सोडू नका. कोणी दुश्मन आहे आणि कोणी लाडके आहेत असं काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी त्यांनी लोकलबाबतही भाष्य केलं. महाराष्ट्रातील परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे. काही ठिकाणी चिंता करायला लागू नये अशी आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी देण्यात आली नाही. याचा अर्थ असा नाही की हे कायमचं बंद राहील. लोकल सुद्धा कधी सुरू होणार? असं विचारलं जात आहे. त्याच्यावरही विचार सुरू आहे. काही गोष्टींना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दुकानांच्या वेळांनाही शिथिलता दिली आहे. इतर गोष्टींनाही शिथिलता मिळेल. पण जबाबदारी घेऊन आणि जबाबदारीचं भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनाकडेही पॉझिटिव्हली पाहायला पाहिजे. कोरोनाने आपल्याला काय शिकवलं याचाही विचार केला पाहिजे. अनावश्यक गोष्टी कशा टाळाव्यात, कारण नसताना गर्दी करू नये, या गोष्टी कोरोनाने आपल्याला शिकवल्या आहेत. सर्वजण घरी असताना पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर होते. ते रस्त्यावर होते म्हणून आपण रस्त्यावर येऊ शकतो हे त्यांचं आपल्यावर ऋण आहे. संकट फार मोठं होतं. अजूनही ते रोरावतंय. हे संकट गेलेलं नाही, असं ते म्हणाले.
पालिका कर्मचाऱ्यांनाही जीव आहे. त्यांनाही कुटुंब आहे. पण तरीही कठिण काळात पालिकेने काम केलं ते अद्वितीय आहे. आपण आपलं मुंबई मॉडेलही तयार केलं. त्याची जगानेही दखल घेतली. आपण करून दाखवलं. आजही कोरोनावर उपचार नाही. पण धाडसानं मॉडल तयार केलं, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. (फोटो क्रेडिट गुगल)