महाराष्ट्रात प्रथमच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे सब व्हेरिएंट बी.ए. 4 चे तीन आणि बी.ए.5 चा 1 रुग्ण आढळला आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली. यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत अजून भर पडली आहे.
दक्षिण आफ्रिकेसह जगाच्या काही भागांमध्ये एप्रिलमध्ये ओमायक्रॉनचे सब-व्हेरिएंट आढळले होते, परंतु मुंबईत आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या आठवड्यात तमिळनाडू आणि तेलंगणामध्येही त्याची प्रकरणे नोंदवली गेली.
मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या अहवालानुसार मुंबईत बी.ए. 4 चे तीन आणि बी.ए.5 चा 1 रुग्ण आढळला आहे. हे सर्व रुग्ण 14 मे ते 24 मे 2022 या कालावधीतील आहेत. यात दोन 11 वर्षांच्या मुली आणि दोन 40 ते 60 वर्ष वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात होते, आता ते बरे झाले असून रुग्णांचा तपशील घेतला जात आहे.
मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 1885 रुग्णांची नोंद झाली. यापैकी 1118 रुग्ण हे मुंबईतील आहेत. आज राज्यात 774 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आज एका मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर 1.86 इतका झाला आहे.
राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही वाढतेय. राज्यात सध्याच्या घडीला 17 हजार 480 सक्रिय रुग्ण संख्या आहे. यात सर्वाधिक संख्याही मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 11 हजार 331 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.