मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स या गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या खास स्टाईलनं चेन्नईला विजय मिळवून दिला. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेली ही मॅच चेन्नई सुपर किंग्सनं 3 विकेट्सनं जिंकली. चेन्नईचा या स्पर्धेतील हा दुसराच विजय आहे. तर मुंबई इंडियन्सनं सलग 7 सामने गमावण्याचा लाजिरवाणा रेकॉर्ड केला आहे.
पॉईंट टेबलचं समीकरण काय?
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीमच्या आता 7-7 मॅच झाल्या आहेत. आयपीएलच्या या सिझनमध्ये प्रत्येक टीम 14 मॅच खेळणार आहे. मुंबईनं आता उरलेल्या 7 ही मॅच जिंकल्या तर त्यांचे 14 पॉईंट्स होतील. सध्या पॉईंट टेबलमध्ये 2 टीम 10 पॉईंट्सवर तर 3 टीम 8 पॉईंट्सवर आहेत. त्यामुळे मुंबईनं उरलेल्या 7 ही मॅच जिंकून 14 पॉईंट्स कमावले तरी त्यांच्यासाठी ‘प्ले ऑफ’चा दरवाजा उघडणे अवघड आहे.
दुसरीकडं चेन्नईनं 7 मॅचनंतर 2 विजय आणि 5 पराभवासह 4 पॉईंट्स कमावले आहेत. चेन्नईचा सध्याचा रनरेट हा – 0.534 आहे. त्यांना ‘प्ले ऑफ’ गाठण्यासाठी उर्वरित सर्व मॅचमध्ये ‘जिंकू किंवा मरू’ या जिद्दीनं खेळलं पाहिजे. तसंच रनरेट चांगला करण्यावरही भर द्यावा लागेल.
आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स 6 मॅचनंतर 5 विजय आणि 10 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं 7 मॅचनंतर 10 पॉईंट्स कमावले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नंबर आहे. या दोन्ही टीमचे प्रत्येकी 8 पॉईंट्स आहेत. सनरायझर्स हैदराबादचेही 8 पॉईंट्स असून त्यांचा रनरेट कमी असल्यानं ते पाचव्या क्रमांकावर आहेत.दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या टीमचा त्यानंतर नंबर असून या सर्व टीमचे प्रत्येकी 6 पॉईंट्स आहेत.