सत्तेचा माज चढला की निर्बंध
लादले जातात : दामोदर मावजो
ज्ञानपीठ विजेते कादंबरीकार दामोदर मावजो यांनी उपस्थिती लावली असून यावेळी त्यांनी परखड मत मांडलं. सत्तेचा माज चढला की निर्बंध लादले जातात अशी टीका यावेळी त्यांनी केली. अशावेळी साहित्यिक गप्प का बसतात? असा सवालही यावेळी त्यांनी विचारला. आज साहित्यिकांमध्येहेही चिअर लीडर्स तयार झालेत. ते सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीला गुमान प्रोत्साहन देतात अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ
लागणार नाही : शरद पवार
लातूरच्या उदगीर नगरीत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. शरद पवार यांनी बोलताना प्रोपागंडा साहित्य निर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण मिळत असून आपल्या देशात असाच विशिष्ट प्रोपागंडा पद्धतशीर पसरवला जात असल्याचं म्हटलं. “राज्यकर्त्यांनी यासाठी साहित्य आणि माध्यमांची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेतली आहे. चित्रपट क्षेत्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. हाच कॉर्पोरेटीकरणाचा प्रयोग आता साहित्यात होत आहे. तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. हे असेच सुरु राहिले तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही. हे टाळायचे असेल तर साहित्यिकांना डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे लागेल,” असं शरद पवार म्हणाले.
देशात २०५० नंतर कुणीही उपाशी पोटी
झोपणार नाही: गौतम अदानी
उद्योगपती गौतम अदानी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत एक अंदाज व्यक्त केला आहे. देशानं २०५० पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्सचं लक्ष्य गाठलं तर या देशात कुणीही उपाशी पोटी झोपणार नाही, असं उद्योगपती गौतम अदानी यांनी सांगितलं आहे. त्यांनी इकोनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये हे वक्तव्य केलं. “आपण २०५० पासून सुमारे १० हजार दिवस दूर आहोत. या काळात आपण आपल्या अर्थव्यवस्थेत २५ ट्रिलियन डॉलर्सची भर घालू असे मला वाटते. याचा अर्थ जीडीपीमध्ये दररोज २.५ अब्ज डॉलर्सची भर पडेल. या काळात आपण सर्व प्रकारची गरिबी दूर करू.” असं गौतम अदानी यांनी सांगितलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांची
सभा चोरीच्या विजेतून
राज्यात सध्या विजेच्या मागणीच्या तुलनेत उपलब्धतेत तफावत निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी लोडशेडिंग सुरु आहे. आधीच तापमान वाढलेलं असताना लोडशेडिंग होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त होत असतानाच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नागपूर शहरात शिवसेना नेते संजय राऊत यांनी रात्री घेतलेली सभा चोरीच्या विजेतून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रात्री राज्यात कोळशाच्या टंचाईमुळे वीज निर्मितीवर परिणाम झाल्याचे सांगत भारनियमन होत असल्याचं सांगितलं.
आयआयटी-मद्रास येथे करोना
बाधित विद्यार्थ्यांचा आकडा ३० वर
तामिळनाडू राज्यात आरोग्य विभाग काहीसा चिंतेत आहे. कारण आयआयटी-मद्रास मधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करोना बाधित झाले असल्याचं समोर आलं आहे. १९ एप्रिलला करोना संसर्ग झाल्याचं दिसून आल्यावर आयआयटी-मद्रासच्या संकुलातील करोना चाचण्या घेण्यात आल्या. तेव्हा १२ विद्यार्थी करोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं. तेव्हा निर्जंतुकीकरण, करोना चाचण्या वगैरे खबरदारीचे उपाय हे मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले. तेव्हा आता यामध्ये आणखी १८ विद्यार्थ्यांची भर पडली आहे. त्यामुळे आयआयटी-मद्रासच्या संकुलातील करोना बाधित विद्यार्थ्यांचा आकडा हा आता ३० वर पोहचला आहे.
इतरांपेक्षा भारताला चांगलं
ओळखतो : इम्रान खान
इम्रान खान मात्र भारतावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. अविश्वास ठराव दाखल होण्यापूर्वी इम्रान खान यांचं भारतप्रेम उफाळून आलं होतं. भाषणात इम्रान खानने भारताचं कौतुक केलं होतं. संबंधित भाषणात त्यांनी म्हटलं की, “मला आज दु:ख देखील होतंय आणि वाईट देखील वाटतंय. आपल्यासोबतच भारत स्वतंत्र झाला. मी भारताला चांगलं ओळखतो. माझे अनेक मित्र देखील आहेत. क्रिकेटमुळे मला लोकांकडून प्रेम मिळालं. मला वाईट वाटतय की आरएसएसच्या विचारसरणीमुळे चांगले संबंध नाही. पण ते फार स्वाभिमानी लोक आहेत.”
कर्नाटकमधील मशिदीखाली
मंदिरसदृश्य अवशेष सापडले
कर्नाटकमधील मंगळुरु येथील एका मशिदीच्या डागडुजीच्या कामाकाजाच्या वेळी मशिदीखाली हिंदू मंदिरा सदृश्य असे काही अवशेष सापडले आहेत. मंगळुरुपासून काही अंतरावर असणाऱ्या या मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी परसरली असून हा सारा प्रकार समोर आल्याची माहिती एनआयनं दिलीय. मिलाली येथील जुमा मशिदीच्या डागडुजीचं काम सुरु आहे. यानिमित्त सुरु असणाऱ्या खोदकामादरम्यान हे अवशेष सापडलेत.
श्रीलंकेच्या हिंसाचारग्रस्त
भागात सैन्य तैनात
श्रीलंकेच्या वायव्येकडील हिंसाचारग्रस्त रामबुक्काना भागात सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सैन्य तैनात केले. यापूर्वी अधिकाऱ्यांनी गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ५ वाजता संचारबंदी हटवली होती. ताज्या इंधन दरवाढीविरुद्ध निदर्शने करणाऱ्या नि:शस्त्र आंदोलकांवर पोलिसांनी येथे केलेल्या गोळीबारात एक जण ठार, तर १३ जण जखमी झाले होते. केगाले रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींपैकी किमान तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. १५ पोलीसही या हिंसाचारात जखमी झाले होते.
मुंबई इंडियन्सने आयपीएलचे
पहिले सात सामने गमावले
मुंबई इंडियन्सने आयपीएलचे पहिले सात सामने गमावले आहेत. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाने पहिले सात सामने पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयपीएलमधील कोणत्याही संघाचा इतका वाईट रेकॉर्ड नाही. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा संघही मुंबई आहे. याआधीही हा खराब विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर होता, जेव्हा संघाने २०१४ च्या आयपीएलमध्ये पहिले पाच सामने गमावले होते. पण त्या मोसमात मुंबईने प्लेऑफमध्ये धडक मारली होती.
नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली
नवाब मलिक यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत मलिकांनी कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने नवाब मलिकांची ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना हा एक मोठा झटका बसला आहे.
राज गर्जनेनंतर आता कोल्हापुरात राष्ट्रवादीची संकल्प सभा, शरद पवारांकडे राज्याचं लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संकल्प सभेच्या निमित्ताने भोंगे पुनः एकदा चर्चेत आला. आहे. उद्या शनिवारी 23 एप्रिलला कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या वतीन संकल्प सभेचे आयोजन केले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वक्तव्यातील भोंग्यांना पुरोगामीत्वाचा भोंग्यांनी उत्तर दिलं जाईल, असा सांगण्यात आहे. मात्र, तरी या संकल्प सभेत राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवार नेमकं काय उत्तर देतील? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
हळद शिजवताना कुकरचा स्फोट, नांदेडमध्ये तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हळद शिजवताना कुकरचा स्फोट होऊन एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या घटनेत आणखी तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत इथे काल 21 एप्रिलला घडली. सुनील मारवाड, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलीस अधिकाऱ्याला 25 लाखांचा गंडा, RTI कार्यकर्त्यासह 7 जणांवर गुन्हा
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क एका पोलीस उपनिरीक्षकांकडून तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाट याच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आता बोर्ड परीक्षांवरही सत्ताधारी पक्षाचा प्रभाव? बारावीच्या प्रश्नपत्रिकेत काँग्रेसबद्दलचे 6 प्रश्न; नव्या वादाला सुरुवात
सहसा राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एखाद्या विशिष्ट पक्षाला अनुसरून प्रश्न विचारले जात नाहीत. मात्र, राजस्थान बोर्डाच्या बारावीच्या प्रश्नपत्रिकेत काँग्रेसबद्दलचे सहा प्रश्न विचारण्यात आल्याचं समोर आलं आहे. गुरुवारी (21 एप्रिल) राजस्थानात बारावीच्या राज्यशास्त्र विषयाची परीक्षा पार पडली. या प्रश्नपत्रिकेत काँग्रेसचे कौतुक करणारे काही प्रश्न विचारण्यात आले होते. सध्या राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे या प्रश्नपत्रिकेवरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
SD social media
9850 60 3590