ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. परवा ते गुजरातमधील साबरमती आश्रमात होते. ते आधी गुजरातमध्ये आणि नंतर दिल्लीत होते. गुजरातमधील जेसीबी कारखान्याला भेट दिली तेव्हा ते चक्क जेसीबीवरुन आल्याचं चित्र पहायला मिळालं. मात्र एकीकडे जहांगीरपुरामध्ये जेसीबीच्या सहाय्याने सुरु असणाऱ्या कारवाईवरुन वाद निर्माण झालेला असताना ब्रिटीश पंतप्रधानांनी अशाप्रकारे या कारवाईचं प्रतिक असलेल्या वाहनासहीत फोटो काढून घेणं हे चुकीचं असल्याचं मत शिवसेनेनं व्यक्त केलंय. जॉन्सन यांच्या सल्लागार मंडळाला समजायला हवं होतं असं सांगतानाच शिवसेनेनं यावरुन अप्रत्यक्षपणे केंद्रात सत्तेमध्ये असणाऱ्या मोदी सरकारवर निशाणा साधलाय.
भारताकडून कुठल्याही देशाला अथवा समाजाला धोका पोहोचलेला नाही. आताच्या जागतिक संघर्षाच्या काळातही संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार भारत करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केले आहे. शीख गुरू तेगबहादूर यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावरून मोदी यांनी जनतेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संदेश देत असताना दिल्लीत धार्मिक तणावाचे वातावरण होते,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
जहांगीरपुरा भागातील दंगलीनंतर तेथे जेसीबी लावून, पोलीस यंत्रणा लावून असंख्य बांधकामे तोडण्यात आली. एकाच समुदायाच्या लोकांना धडा शिकविण्यासाठी त्या भागात जेसीबी चालविण्यात आले. त्यामुळे देशभरात हाहाकार माजला आहे. या भागात हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेवर हल्ला झाला व त्यातून दंगल भडकली हे सत्य आहे, पण आतापर्यंत हनुमान जयंतीच्या म्हणून शोभायात्रा कधीच कोठे निघाल्या नव्हत्या. त्या नेमक्या या वेळीच काढण्यात आल्या व दंगली पेटविण्यात आल्या. जहांगीरपुऱ्यातील जेसीबी कारवाई हे भाजपासाठी स्वाभिमानाचे प्रतीक बनले आहे. ही कारवाई फक्त मुसलमान समुदायाला धडा शिकविण्यासाठी केली हा आक्षेप तितकासा खरा नसावा. कारण असंख्य हिंदूंच्या झोपड्या व व्यवसाय त्याच बुलडोझरने उद्ध्वस्त केले. म्हणजे फटका दोन्ही बाजूंना बसला,” असा उल्लेख ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये आहे.
“सध्या ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी ते गुजरातमध्ये होते. महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला त्यांनी भेट दिली. चरख्यावर सूतकताई केली व त्याच दिवशी त्यांनी अहमदाबादमधील एका ‘जेसीबी फॅक्टरी’स भेट दिली. जॉन्सन एका जेसीबीवर चढले व फोटो काढले. जॉन्सन यांना जेसीबी फॅक्टरीत खास नेण्यात आले व उत्सव केला गेला. कारण त्याच वेळी देशभरातील विरोधी पक्ष दिल्लीतील ‘जेसीबी’ कारवाईविरुद्ध आवाज उठवीत होते, याचा काय अर्थ घ्यायचा?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.