आज दि.११ जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दुखापतीमुळे भारताला होईल फायदा? कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर

ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्या दरम्यान भारतीय संघ  चार सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाने नुकतीच 18 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाचे स्टार गोलंदाज हे दुखापत ग्रस्त असल्यामुळे ही कसोटी मालिका ऑस्ट्रेलियासाठी तितकीशी सोपी असणार नाही. तेव्हा दुखापतग्रस्त ऑस्ट्रेलिया संघासोबत खेळात कसोटी मालिकेत भारतीय संघाला फायदा होईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी कांगारू संघात चार फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. ऑफस्पिनर टॉड मर्फीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कमाल केली आहे. त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहून त्याला ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघावर नजर टाकली तर टॉड मर्फी, अॅश्टन अगर, मिचेल स्वेपसन आणि नॅथन लायन यांचा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचे स्टार गोलंदाज ग्रीन आणि स्टार्कला दुखापत झाली होती. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या बोटात फ्रॅक्चर झाले होते. ऑस्ट्रेलिया संघातील स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क आणि अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांना दुखापतीमुळे भारताविरुद्ध कसोटी क्रिकेट संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे.

 ‘महाराष्ट्र केसरी’साठी सर्वांना समान संधी, बघायला मिळतील चटकदार लढती

राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आकर्षण असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती गटात अव्वल कुस्तीगिरांना समान संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. या वजनी गटाच्या लढती आज संध्याकाळी सुरू होतील. त्यापूर्वी सकाळच्या सत्रात गटातील सर्व मल्लांची वजने आणि वैद्यकीय चाचणी पार पडली. त्याचबरोबर स्पर्धेचा भाग्यांकही (सोडत) काढण्यात आला.

भाग्यांकानुसार गादी विभागातील हर्षवर्धन सदगीर, अक्षय शिंदे, तुषार दुबे हे आव्हानवीर एकाच गटात आले असून, शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन कोकाटे हे अन्य आव्हानवीर दुसऱ्या गटातून एकत्र आले आहेत. त्यामुळे साखळीतच पुणेकरांना चटकदार लढती बघायला मिळणार आहेत.
माती विभागात पुण्याच्या आशा असलेला दिवंगत मल्ल अमृता मोहोळे यांचा नातू पृथ्वीराज मोहोळ, महेंद्र गायकवाड, शैलेश शेळके हे एका गटात एकत्र आले आहेत. माऊली जमदाडे, तुफानी मल्ल किरण भगत आणि माजी विजेता बाला रफिक शेख हे दुसऱ्या गटात एकत्र आले आहेत.

2 हजारहून अधिक काडीपेटी, ओडिशाच्या मुलानं तयार केली हॉकी वर्ल्ड कपची प्रतिकृती!

जागतिक हॉकीमधील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेला शुक्रवार 13 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. ओडिशा राज्यात सलग दुसऱ्यांदा या हॉकी विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले असून आज या स्पर्धेचा उदघाटन सोहोळा पार पडणार आहे.  क्रीडा रसिकांमध्ये या स्पर्धेविषयी उत्साह पहायला मिळत असून ओडिशामधील एका 19 वर्षीय युवकाने 2 हजारहून अधिक काडीपेटीच्या काड्यांपासून हॉकी वर्ल्ड कप 2023 च्या ट्रॉफीची  प्रतिकृती तयार केली आहे.

शिर्डी साईंच्या झोळीत करोडोंचे दान; भाविकाने 1 कोटीच्या डीडीसह 27 लाखांची सोन्याची आरती केली अर्पण

2022 च्या रेकॉर्डब्रेक देणगीनंतर 2023 च्या सुरुवातीलाच शिर्डीच्या साईबाबांना तब्बल एक कोटी रुपयांचे दान एका भाविकाने दिले आहे. हैदराबाद येथील साईभक्त राजेश्वर यांनी साईबाबांना ही एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यांनी हे दान मेडिकल फंडमध्ये हे दान दिले असल्याचे साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव यांनी सांगितले.

‘महाविकासआघाडी’चं ठरलं! विधानपरिषदेच्या 5 जागा एकत्र लढणार, नागपुरचा तिढा सुटला

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीचा महाविकासआघाडीचा तिढा अखेर सुटला आहे. महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली, या बैठकीत पाच जागांसाठीचा मार्ग काढण्यात आला. अमरावती आणि नाशिकमध्ये काँग्रेसचा उमेदवार, तर कोकणात शेतकरी कामगार पक्षाचा, नागपुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मराठवाड्यात राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात उतरणार आहे.

अमरावती विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून धीरज लिंगाडे यांचं नाव निश्चित झालं आहे. तर नाशिकमधून काँग्रेसचेच सुधीर तांबे पदवीधर मतदारसंघातून रिंगणात आहेत. सुरूवातीला नागपूरची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यास काँग्रेस तयार नव्हती, त्यामुळे महाविकासआघाडीमध्ये पेच निर्माण झाला होता.

जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेची विमान सेवा ठप्प; व्हाइट हाऊसने सांगितले, ‘हा सायबर हल्ला…’

अमेरिकेची विमान सेवा अचानक ठप्प झाली आहे. विमानतळ आणि एअर ट्राफिक कंट्रोल रुमच्या संगणकात अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे संपूर्ण देशातील विमान सेवा ठप्प झाली आहे. पुढचे आदेश येईपर्यंत विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहेत. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या (FAA) संगणकात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमानसेवा प्रभावित झाल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार आतापर्यंत २५१२ विमानांना उड्डाण घेण्यास उशीर झाला आहे. तर २५४ डोमेस्टिक विमाने रद्द करण्यात आली आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून सखोल चौकशी करण्याचे आदेश व्हाइट हाऊसकडून देण्यात आले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचा जॉन्सन अँड जॉन्सनला दिलासा, बेबी पावडरच्या उत्पादन आणि विक्रीस संमती

मुंबई उच्च न्यायालयाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दिलासा दिला आहे. या कंपनीविरोधात महाराष्ट्र सरकारने केलेली कारवाई अत्यंत कठोर आणि अन्यायकारक आहे असंही कोर्टाने म्हटलं आहे. तसंच उच्च न्यायालयाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री करण्यास संमती दिली आहे. त्यांची विक्री आणि वितरण करण्याचा परवाना रद्द करण्याचे तीन आदेशही कोर्टाने रद्द केले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला बेबी पावडरच्या उत्पादनाची निर्मिती, विक्री आणि वितरण हे करण्यासाठी संमती दिली आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि एसजी डिगे यांच्या खंडपीठासमोर कंपनीने १५ सप्टेंबर २०२२ च्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी केली होती. त्यानंतर त्यांचा परवाना रद्द करण्यात आला होता. तर २० सप्टेंबर २०२२ च्या दुसऱ्या आदेशात उत्पादन आणि विक्री थांबवण्याचा आदेश दिला होता. मात्र आता कोर्टाने कंपनीला दिलासा दिला आहे. या प्रकरणात कंपनीने मंत्री महोदयांकडेही अपील केलं होतं मात्र १९ ऑक्टोबर २०२२ ला ते फेटाळण्यात आलं.

वनडे क्रमवारीत विराट कोहलीची मोठी झेप; ‘या’ दोन भारतीयांनाही झाला फायदा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी (11 जानेवारी) खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना फायदा झाला आहे. कोहलीने गुवाहाटी एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले होते, ज्याचा त्याला बंपर फायदा झाला आहे.

एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत विराट कोहलीला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तो सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहलीशिवाय टॉप-१० मध्ये भारताचा दुसरा फलंदाज रोहित शर्मा आहे, त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. रोहित आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.