मकर संक्रांतीपासून उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये थंडीची लाट येणार आहे, त्यामुळे आठवड्याच्या शेवटी महाराष्ट्रातल्या तापमानामध्ये कमालीची घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रही गारठणार आहे, असं स्कायमेटकडून सांगण्यात येत आहे.
’15 जानेवारी ते 18 जानेवारीच्या कालावधीमध्ये विदर्भ, पुणे, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिकमध्ये सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद होणार आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये आधीच एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यामध्ये आज सकाळी 9.4 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. पुढच्या काळात पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे,’ असं स्कायमेटच्या महेश पलावट यांनी सांगितलं आहे.
मुंबईमध्ये राज्याच्या तुलनेत जास्त तापमानाची नोंद होईल, पण हे तापमान सरासरीपेक्षा कमीच असेल, असा स्कायमेटचा अंदाज आहे. हिमालयातून थंड वारे पश्चिमेच्या दिशेने वाहू लागले आहेत, त्यामुळे थंडीची लाट येणार आहे, असं महेश पलावट म्हणाले.
दुसरीकडे आयएमडीनेही नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिकमध्येही सगळ्यात कमी तापमानाची नोंद होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. थंडीच्या लाटेचा औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर आणि सोलापूरलाही फटका बसेल. मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्यामध्ये मात्र थंडीच्या या लाटेचा परिणाम कमी जाणवेल.
सांताक्रुझ वेधशाळेने मुंबईचं तापमान 17 तर कुलाबा वेधशाळेने 20 डिग्री असल्याचं सांगितलं आहे. हे तापमान 16 ते 18 डिग्रीमध्ये राहिल आणि आठवड्याच्या शेवटी यात आणखी घट होऊ शकते, असं आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे.