नागालँड विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये पुन्हा भाजप-एनपीपी युतीने सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्री नेफियू रियो यांच्या नेतृत्वाखाली युतीने ही निवडणूक लढवली होती. आता ते पाचव्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. दरम्यान, नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागांवर विजय मिळवला आहे. पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला नागालँडमध्ये विरोधीपक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला दोन जागी विजय मिळाला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार नागालँडमध्ये भाजप एनडीपीपी युतीला बहुमत मिळालं आहे. ६० पैकी ३७ जागांवर त्यांचा विजय झाला आहे. यातील २५ एनडीपीपी आणि भाजपला १२ जागा मिळाल्या आहेत.
नागालँडमध्ये एनडीपीपी आणि भाजपला एकूण ३७ जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षांनंतर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा आहे. तर नॅशनल पिपल्स पार्टीला ५ जागी विजय मिळाला आहे. याशिवाय अपक्ष ४ आणि आरपीआय़, लोजपा, नागा पिपल्स फ्रंट यांना प्रत्येकी दोन जागा जिंकता आल्या आहेत. तर जनता दल युनायटेडने एक जागा जिंकली आहे.
२०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ६ जागा लढवल्या होत्या. मात्र तेव्हा एकाही जागेवर त्यांना विजय मिळाला नव्हता. सर्वच जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. तर भाजपने २० पैकी १२ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसने तेव्हा १८ जागा लढवल्या होत्या. मात्र एकही जागा जिंकली नव्हती. काँग्रेसची यंदाही अशीच परिस्थिती आहे.