एकनाथ शिंदे यांचे महाबंड असून त्यांचाच गट खरी शिवसेना आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सांगली येथे सामुहिक आत्महत्या झालेल्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी म्हैसाळला भेट दिल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, “महाविकास आघाडी अनैसर्गिक होती. बंडाळीमुळे सेनेतील असंतोष बाहेर पडला आहे. महाविकास आघाडीचा विकासाचा अजेंडा नव्हता. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक आमदार बंडामध्ये सहभागी झाले.” पुढे बोलताना आठवलेंनी, “राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तोंड काळे झाले आहे. सेनेच्या बहुसंख्य आमदारांचे मत भाजपासोबत युती करण्याचे होते. मात्र संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांची दिशाभूल केली,” असा दावा आठवलेंनी केलाय.
“यापूर्वी भुजबळ, राणे, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळेपेक्षा आताची स्थिती वेगळी असून हे महाबंड आहे. आपण शिंदेंचा गटच खरी शिवसेना मानतो. भाजपाने आता सरकार स्थापन्यासाठी पुढाकार घ्यावा,” असं आठवले म्हणाले. तसेच, रिपाईला सत्तेत वाटा मिळायला हवा असेही ते म्हणाले.
“राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवार यांना उभे करून बळीचा बकरा बनविण्याचा राऊत यांचा डाव होता, मात्र पवार मुरब्बी राजकारणी असल्याने त्यांनी राष्ट्रपती निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले,” असेही आठवले म्हणाले. “महाराष्ट्रतील परिस्थिती सध्या अस्थिर आहे, शिंदे यांनी केलेले बंड शिवसेनेला हा जबरदस्त झटका आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लागला आहे. अजित पवारांसारखा एकनाथ शिंदेंचा हा प्रयोग फसणार नाही. कारण अजित पवारांनी फडणवीसांसोबत शपथ घेताना नियोजन केले नव्हते, त्यामुळे सरकार स्थापन करण्याचा त्यांचा प्रयोग फसला,” असेही ते म्हणाले.