धनुष्यबाण कुणाचे या प्रश्नाभोवती गेल्या चार महिन्यांपासून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद शिगेला पोहोचला आहे. याच मुद्यावर काल निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली आहे. धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याचा फैसला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. निवडणूक आयोगासमोर पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
धनुष्यबाण चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळणार या प्रकरणावर काल निवडणूक आयोगात सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. तर शिंदे गटाकडूनही वकिलांची मोठी फौज युक्तिवादासाठी हजर होती.
‘शिंदे गटाने दाखल केली कागदपत्र ही जुनी आहे, महेश जेठमलानी यांनी केलेला दावा हा बोगस आहे. शिवसेनेमध्ये जी फूट पडली आहे त्याचा परिणाम पक्षावर होणार नाही त्यामुळे ही फूट ग्राह्य धरू नये. ही फूट काल्पनिक असू शकते. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच ही खरी शिवसेना आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत निर्णय घेऊ नये, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता.
तर, शिंदे गटाकडे पुरेसं संख्याबळ आहे. एखादा गट बाहेर पडला तर त्यात गैर काय आहे. आमदार, खासदारांची जास्त संख्या आमच्याकडे आहे. बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी महत्त्वाची आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला.
10 जानेवारीच्या सुनावणीमध्ये काय घडलं?
दरम्यान, मागील आठवड्यात 10 जानेवारी मंगळवारी यावर दोन्ही बाजूंकडून निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद झाला होता. उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपद बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून करण्यात आला होता. तर सुप्रीम कोर्टातील सत्ता संघर्षावर निर्णय घेईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी ठाकरेंच्या पक्षानं निवडणूक आयोगातील सुनावणीदरम्यान केली होती.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा युक्तिवाद
तर, अद्याप कुणालाही अपात्र ठरवलं नाही. धनुष्यबाण कुणाचा हे ठरवण्यात अडथळा नाही. आमदार, खासदारांची आमच्याकडे जास्त संख्या आहे. बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी महत्त्वाची आहे. सर्व निकषांवर शिंदे गटच सरस आहे. शिवसेनेची जुनी घटना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची घटना बदलली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतलं मात्र ते शिवसेनाप्रमुख होत नाहीत बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव यांनी स्वतःकडे अधिकार घेतले. शिवसेनेच्या घटनेत उद्धव यांनी केलेला बदल बोगस आणि बेकायदेशीर आहे, असा दावा शिंदे गटाने केला होता.