आभासी चलन (क्रिप्टो करन्सी) संबंधातील व्यवहाराच्या संदर्भात धमक्या दिल्याच्या आरोपावरून क्रिकेटपटू विजय झोल याच्यासह इतरांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील मंगरुळ (ता. घनसावंगी) येथील किरण खरात यांनी प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. विजय झोल भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार राहिलेला आहे.
दरम्यान, स्थानिक आमदार कैलास गोरंट्याल यांनी याप्रकरणी शिंदे गटातील माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावरही आरोप केले आहेत. खोतकर यांच्यासह झोल परिवारातील सदस्यांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गोरंट्याल यांनी केली असून यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. करात यांचे पुणे येथून अपहरण करण्यात येऊन बळजबरीने त्यांच्या काही मालमत्ता नावावर करून घेण्यात आल्याचा आरोपही गोरंट्याल यांनी केला.
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना खोतकर म्हणाले, गोरंट्याल यांना आपल्या नावाची कावीळ झाली आहे. म्हणून ते आपल्यावर खोटे-नाटे आरोप करत असतात. क्रिप्टो करन्सीच्या संदर्भात पाचशे कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला त्याला पाठिशी घालण्याचे काम केले म्हणून गोरंट्याल यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. क्रिप्टो करन्सीच्या प्रकरणात फसवणूक झालेल्यांपैकी दोघे-तिघे आले होते म्हणून त्यांना घेऊन पोलिसांकडे गेलो होतो. पोलीस याप्रकरणी कारवाई करतील. शेतकरी, रिक्षाचालक, हातगाडीवाले, इत्यादींची याप्रकरणात फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात आपल्या जावयावर करण्यात येणारे आरोप खोटे असल्याचेही खोतकर म्हणाले.