‘अमित शाहांसोबत राष्ट्रवादीच्या तीन बैठका’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने बॉम्ब फोडला!
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं आहे. शरद पवारांच्या राजीनाम्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या अमित शाह यांच्यासोबत तीन बैठका झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.’काही नेत्यांच्या भाजपच्या नेत्यांसोबत बैठकी सुरू आहेत, अशा बातम्या वर्तमानपत्रात आपण सर्वांनी पाहिल्या आहेत. त्या बातम्यांचं कुणी खंडन केलेलं नाही. मी आणखी खोलात जाऊन पत्रकारांना विचारलं, तेव्हा अमित शाहंसोबत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तीन-तीन बैठका झाल्या आहेत, असं कळलं’, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
अभ्यासक्रमातून उत्क्रांती सिद्धांत काढण्यास महा. अंनिसचा विरोध, निषेध करत ‘या’ अभियानाची घोषणा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एनसीईआरटीच्या दहावीच्या अभ्यासक्रमातून उक्रांतीचे विज्ञान सांगणारा भाग वगळल्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. तसेच या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टीकोन विकसित होण्यात अडथळा येईल, असं म्हणत एका अभियानाची घोषणा केली आहे. यानुसार अंनिस राज्यभर ‘चला उत्क्रांती समजून घेवूया’ हे अभियान राबवणार आहे. “दहावीच्या अभ्यासक्रमात अनुवांशिकता आणि उत्क्रांती असे दोन भाग होते. आता त्यातील उत्क्रांती हा भाग वगळून त्या जागी केवळ अनुवांशिकता एवढाच भाग ठेवण्यात आला आहे. अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान वगळण्याच्या निर्णयाचा आम्ही कृतीतून निषेध व्यक्त करणार आहोत,” असं अंनिसने सांगितलं. याबाबत महाराष्ट्र अंनिसकडून डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव आणि श्रीपाल लालवाणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.
सांगलीत बारा लाखांचे खवले जप्त, दोघांना अटक
आंतरराष्ट्रीय दर्जाची सौंदर्य प्रसाधने, औषधे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे खवल्या मांजराची खवले तस्करी पोलिसांनी उघडकीस आणून ११ लाख ८७ हजारांची खवले पोलिसांनी कुपवाडमध्ये जप्त केली. या प्रकरणी दोन तस्करांना अटक करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी बुधवारी दिली.
सातवीतील विद्यार्थ्याकडून अंदाधुंद गोळीबार, आठ शाळकरी मुलांसह सुरक्षारक्षकाचा मृत्यू
सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने शाळेत अंदाधुंद गोळीबार केला आहे. या दुर्दैवी घटनेत आठ शाळकरी मुलांसह एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य सहा विद्यार्थी आणि एक शिक्षक जखमी झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला अटक केली. आरोपीनं आपल्या वडिलांच्या बंदुकीने हा गोळीबार केला आहे. गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी येणार बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर
मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रचंड गाजला आणि प्रेक्षकांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला. त्यानंतर आता त्याच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटाचा टीझर पाहून यामध्ये दाखवल्या गेलेल्या दृश्यांमुळे या चित्रपटावर टीका गेली गेली. या चित्रपटावर केल्या गेलेल्या टीकेनंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. आता हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याची तारीख समोर आली आहे.
SD Social Media
9850 60 3590