आज दि.५ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय रद्द, राष्ट्रवादीला मिळणार उत्तराधिकारी, शरद पवारांचे स्पष्ट संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.शरद पवार म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.” “देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे, माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

शरद पवारांच्या सर्वात महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत अजित पवार गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी पक्षातील सर्व मुख्य नेते, आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार या पत्रकार परिषदेला अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.’लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मंगळवारी (2 मे) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. यानंतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना तर सभागृहातच अश्रू अनावर झाले. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सर्वजण करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

जम्मूमध्ये ५ जवान शहीद, भारतीय लष्कराच्या सर्च ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांचाही खात्मा

भारतीय लष्कराच्या वाहनावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या वाहनावर जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत काही दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात जवानांना यश आले असून भारतीय सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरूच आहेत.मुसळधार पाऊस आणि दृष्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत २० एप्रिल रोजी अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. याप्रकरणातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याकरता ३ मे पासून अभियान राबवण्यात येत आहे. राजौरी जिल्ह्यातील कांडी भागातील केसरी हिल येथे दहशतवाद्यांचा गट लपला असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी हे सर्च ऑपरेशन राबवले.

चित्रपटावरील वादावर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा म्हटलं आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसकडूनही सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटावरून वाद सुरू असताना भाजपाकडून सातत्याने या चित्रपटाचं आणि त्यात दाखवलेल्या घटनांचं समर्थन केलं जात आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या चित्रपटावर बोलले आहेत. नरेंद्र मोदी सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. बेल्लारी येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी द केरला स्टोरी या चित्रपटाचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला.

हस्तांदोलन नाही, संवाद नाही; पाकिस्तानी नेत्याला फक्त ‘नमस्कार’

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी गुरुवारी भारतात दाखल झाले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या शिखर परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत. गोव्यातील बेनौलिम येथे ही परिषद होत आहे. पाकिस्तानच्या उच्चपदस्थ नेत्याने भारताला भेट देण्याची २०११ नंतर ही प्रथमच वेळ आहे. तब्बल १२ वर्षांनंतर पाकिस्तानी मंत्री भारतात दाखल झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय परिषदेत रशियन नेत्याची युक्रेनच्या खासदाराकडून धुलाई

सध्या संपूर्ण जगभरात रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची चर्चा आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या सीमेवर सुरू असलेल्या या युद्धाने आता सीमा पार केल्या आहेत. कारण दोन्ही देशांचे प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भिडल्याचं नुकतंच पाहायला मिळालं. यात दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी एकमेकांना मारहाण केली. युक्रेनचे खासदार अलेक्झांडर मारिकोव्स्की यांनी टर्कीची राजधानी अंकारा येथील एका शिखर परिषदेवेळी रशियन प्रतिनिधीला पाच-साह ठोसे मारले.

बद्रीनाथला जाणाऱ्या महामार्गावर दरड कोसळली

उत्तराखंडमधील हेलंग येथे येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर बद्रीनाथला जाणारा महामार्ग ठप्प झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने बद्रीनाथ यात्रा थांबवली आहे. दरड कोसळल्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. महामार्गवर दरड कोसळल्याने हजारो पर्यटक अडकल्याची माहिती मिळत आहे.हेलंग येथील समोर आलेल्या व्हिडीओनुसार, दरड कोसळून महामार्गावर पडत आहे. दरड कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. व्हिडीओत लोक इकडे-तिकडे पळताना दिसत आहेत.

तब्बल १४ दिवसांनी ‘किसी का भाई किसी की जान’ने जमवला १०० कोटींचा गल्ला

सलमान खानचा बहुचर्चित ‘किसी का भाई किसी की जान’ ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस घट नोंदवण्यात आली होती. सलमानचा मल्टिस्टार चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात अपयशी पडल्याचे दिसून आले. मात्र, आता सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाने नुकतेच भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.प्रदर्शनाच्या दोन दिवसानंतर चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १०५ कोटी रुपयांची कमाई केली. तर जागतिक स्तरावर या चित्रपटाने १७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सलमानच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांपैकी ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची सगळ्यात कमी कमाई ठरली आहे. चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत चांगली कमाई केली होती. मात्र, त्यानंतर चित्रपटाच्या कमाईला उतरती कळा लागली. १४ व्या दिवशी चित्रपटाने ९० लाख रुपयांची कमाई केली.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.