आज दि.६ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; मान्सूनबाबत मोठी अपडेट

राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात कडाक्याच्या उन्हाने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना यंदा मात्र गारेगार वातावरण अनुभवता येत आहे. एप्रिल आणि आता मे महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरू असून, या अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम पर्जन्यमानावर होण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. खरीप हंगामात पावसात खंड पडल्यास बळीराजा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शरद पवारांचा राजीनामा कायम राहावा यासाठी…; जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटानं खळबळ

शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगती भाग दोन या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. शरद पवार यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांना धक्का बसला होता. मात्र नेत्यांनी केलेल्या मनधरणीनंतर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील यांच्या या गौप्यस्फोटानंतर चर्चेला उधाण आलं आहे.शरद पवारांचा राजीनामा कायम राहण्यासाठी बरेच जण देव पाण्यात घालून बसले होते. राष्ट्रवादीपासून शरद पवार बाजूला गेले असते तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते, असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा इशारा नेमका कोणाकडे आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मुस्लीम विद्यार्थ्याची कमाल! संस्कृत बोर्डाच्या परिक्षेत राज्यात अव्वल, १३ हजार मुलांना टाकलं मागे

उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षा परिषद बोर्डाने हायस्कूल आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. बलिया येथील रहिवासी असलेल्या आदित्य सिंह हायस्कूल परिक्षेत ९२.५० टक्के गुणांसह अव्वल ठरला आहे. तर चंदौलीच्या इरफानने ८२.७१ टक्के गुणांसह इंटर परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर गंगोत्री देवीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. उत्तर प्रदेशात यंदा १३,७३८ विद्यार्थ्यांनी १२ वीची (संस्कृत) परिक्षा दिली. तर ५० हजारांहून अधिक विद्यार्थी १० वीच्या (संस्कृत) परिक्षेला बसले होते.१२ वीच्या परिक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या इरफानला संस्कृत शिक्षक व्हायचं आहे. मेरिट यादीत पहिल्या २० विद्यार्थ्यांमध्ये तो एकमेव मुस्लीम विद्यार्थी आहे. इरफान हा उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचे वडिल सलाउद्दीन हे शेतमजूर आहेत. संस्कृत परिक्षेत तो राज्यात पहिला आला आहे. मंडळाकडे संस्कृत भाषा आणि साहित्य हे दोन अनिवार्य विषय आहेत, यासह इतर विषय देखील आहेत.

राज ठाकरेंच्या सभेसाठी रत्नागिरीला निघालेल्या मनसे नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू; 3 गंभीर जखमी

रत्नागिरीमधून मोठी बातमी समोर येत आहे. आज राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये सभा आहे. रत्नागिरीमधील सभेला जात असताना मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटना घडली आहे. देवा साळवी असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. ते दहीसर मनसेचे  उपाध्यक्ष होते. या अपघातामध्ये अन्य तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्यावर संगमेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात महिलेला विंचवाचा दंश

एअर इंडियाच्या विमानात विंचवाने एका महिलेला दंश केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २३ एप्रिल रोजी नागपूरहून मुंबई जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ही घटना घडली. दरम्यान, विमान मुंबई विमानतळावर उतरताच महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे.टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, २३ एप्रिल रोजी एअर इंडियांच्या एआय ६३० विमानाने नागपूरहून मुंबईसाठी उड्डाण भरले होते. मात्र, उड्डाण भरल्याच्या काही मिनिटांनंतर विंचवाने विमानातील एका महिलेला दंश केला. याची माहिती पायलटला मिळताच, त्यांनी मुंबई विमानतळावर वैद्यकीय पथक तैनात करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विमान मुंबई विमानतळावर उतरताच महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती आता स्थिर असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कावेरी मोहीम फत्ते, सुदानमध्ये अडकलेले सर्व भारतीय मायदेशी परतले

सुदानमधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने २४ एप्रिलपासून ‘ऑपरेशन कावेरी’ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेद्वारे जल आणि हवाई मार्गाने हजारो भारतीयांना मायदेशात परत आणण्यात भारत सरकार यशस्वी झालं आहे. या मोहीमेअंतर्गत तब्बल ३,८६२ भारतीय सुखरूप मायदेशी परतले आहेत. त्यानंतर आता ही मोहीम बंद करण्यात आली आहे. भारतीय वायूसेनेचं शेवटचं विमान शुक्रवारी ४७ भारतीय नागरिकांना घेऊन मायदेशी परतलं. त्यानंतर ही मोहीम थांबवत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारपदी भारतीय वंशाच्या महिलेची नियुक्ती, जो बायडेन यांच्या कोअर टीममध्ये समावेश!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारमध्ये आणखी एका भारतीय वंशाच्या महिलेला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. जो बायडेन यांनी भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची देशांतर्गत धोरणविषयक सल्लागार पदी नियुक्ती केली आहे. त्या विद्यमान सल्लागार सुसान राइस यांची जागा घेतील. या निर्णयानंतर नीरा टंडन या व्हाईट हाऊसच्या सल्लागार समितीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला अधिकारी असतील.

शांतिनिकेतनमध्ये अमर्त्य सेन यांच्या समर्थनार्थ मोर्चा

नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी शांतिनिकेतनमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये शहरातील बुद्धिवादी आणि स्थानिकांनी सहभाग घेतला. विश्वभारती विद्यापीठाने अमर्त्य सेन यांच्यावर जमिनीवर आक्रमण करण्याचा आरोप ठेवून त्यांना ती जमीन रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे वाद उद्भवला आहे. या प्रकरणी सेन यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी मोर्चा काढला.आंदोलकांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची गाणी गायली, कविता म्हटल्या आणि त्यांनी लिहिलेल्या नाटकांमधील काही भागांचा अभिनय केला. आंदोलक शुक्रवारी सकाळी विश्वभारतीच्या आवारातील शिक्षण भवनाजवळ जमा झाले. तिथे त्यांनी सेन यांच्या ‘प्रतिची’ या घराबाहेर मानवी साखळी उभारली आणि गुरुदेवांची गाणी गात मिरवणूक काढली. साहित्यिक आणि विश्वभारतीचे माजी अध्यापक स्वपन कुमार घोष यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.