शरद पवार यांच्या राजीनामास्त्राचा नेमका अर्थ काय?
मविआ संपवण्यासाठी भाजप शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीही फोडणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात अगदी काल परवापर्यंत सुरू असतानाच शरद पवारांनी आज असा काही राजीनामा बॉम्ब फोडला की, सगळेच भांबावून गेले आहेत. पण मग पवारांनी असं का केलं असेल बरं? चला तर त्याचीच उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपणही करून पाहुयात.’लोक माझे सांगाती भाग 2′ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राजीनामा बॉम्ब फोडला. यानंतर फक्त राष्ट्रवादीच नाही तर महाराष्ट्रातलं राजकारणही ढवळून निघालंय. अनेकांना पवारांची ही भावनिक राजकीय चाल वाटतेय तर काहींना भाजपसोबत जाण्यासाठीचा ‘वे ऑफ’ वाटतोय. कारण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. अजित पवार यांनीही उघडपणे सीएम होण्याची ईच्छा व्यक्त करून एकप्रकारे या चर्चांना हवाच दिली. पण आयुष्यभर पुरोगामी प्रतिमा जपलेल्या पवारांना या वयात भाजपसोबत जाणं अजिबात मान्य नाही. म्हणूनच पवारसाहेबांनी स्वत: अध्यक्षपदावरून दूर होत एकप्रकारे अजित पवारांना भाजपसोबत जाण्यासाठी वाटच मोकळी करून दिल्याचं बोललं जातंय.
अजित पवार ही नाराज
आपल्या मागे अध्यक्ष पदावरून पक्षात उभी फूट पडू द्यायची नसेल तर आत्ताच आपल्या डोळ्यासमोरच मुलगी सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपद मिळवून दिलं तर काय वाईट. आणि समजा अजित पवार यांना निर्णय मान्य नसेलच तर ते भाजपसोबत जातील. कदाचित म्हणून पवार यांनी हे इमोशनल कार्ड खेळल्याचं बोललं जातं आहे. अर्थात अजित पवारांना हा निर्णय फारसा रुचलेला नसल्याचं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरूनच दिसत होतं.
शरद पवारांनी केली बाळासाहेब ठाकरेंची ‘कॉपी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशी घोषणा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली. अशीच घोषणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा केली होती. त्यावेळी लाखो शिवसैनिकांनी मातोश्रीकडे धाव घेतली होती. त्यानंतर बाळासाहेबांनी सर्वांच्या भावनांचा आदर करत निर्णय मागे घेतला होता. आता हात प्रसंग शरद पवार यांच्या बाबतीत घडला आहे. दिवसभर राष्ट्रवादीच्याा कार्यकर्त्यांनी सिल्व्हर ओक बाहेर ठिय्या मांडला होता.
“जे पेराल, तेच उगवेल”, अतिक अहमदच्या हत्येनंतर योगी आदित्यनाथ यांची प्रयागराजमध्ये पहिलीच सभा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगार-राजकीय पुढारी अतिक अहमद आणि त्याच्या भावाची हत्या झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रयागराजमध्ये पाऊल ठेवले. या वेळी एका कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले की, काही लोकांनी आपल्या पापी वृत्तीने प्रयागराजच्या भूमीला जेरीस आणले होते. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी ‘रामचरितमानस’चा दाखला दिला. ते म्हणाले, हे जग कर्माच्या नियमावर चालते. जो जसा वागतो, तशीच क्रिया त्याच्यासोबत होते. उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लुकेरगंज येथील प्रेस ग्राऊंडवर जाहीर सभेला संबोधित करीत असताना अतिक अहमदच्या हत्येवर भाष्य केले.
कामगारदिनी पॅरिसमध्ये हिंसाचार, १०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी
फ्रान्सच्या पॅरिसमध्ये निवृत्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत १०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी ९० जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती फ्रान्सचे मंत्री जेराल्ड डर्मेनिन यांनी दिली.
राणा दाम्पत्याला मोठा फटका, बाजार समितीच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सहकार क्षेत्रात दमदार पदार्पण करण्याची महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या गटाचा भ्रमाचा भोपळा फुटल्याने जिल्ह्याच्या राजकारणातील बदलत्या प्रवाहाचे संकेत मिळू लागले आहेत.सहकार क्षेत्रात राजकीय पक्षांचा थेट सहभाग नसतो, हा समज यावेळी सपशेल खोटा ठरविण्यात वेगवेगळ्या पक्षातील पुढाऱ्यांमध्ये यावेळी अहमहिका पहायला मिळाली. राजकीय हस्तक्षेपाने जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका गाजल्या. पण, पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक वेगळ्या अर्थाने लक्षवेधी ठरली. अमरावती आणि भातकुली या दोन तालुक्यांची ही बाजार समिती आपल्या ताब्यात आल्यास राजकीय ताकद आणखी वाढेल, हा उद्देश ठेवून रवी राणा हे पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. सोबतीला भाजपमधील स्थानिक नेते होते.
कर्नाटकातील अर्ध्याहून अधिक जागांवर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षाही जास्त!
कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक आयोगाची तयारी जोरात सुरू आहे. या वेळी कर्नाटकच्या २२४ विधानसभा मतदारसंघापैकी ११२ मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत हेच प्रमाण ६७ मतदारसंघात अधिक असल्याचे आढळून आले होते. मात्र या वेळी महिलांची संख्या ११२ मतदारसंघात अधिक असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांच्या डेटावरून लक्षात आले. यासोबतच मतदार याद्यांतील महिला मतदारांचे प्रमाण या वेळी वाढल्याचे दिसून आले आहे. मागच्या पाच वर्षांत १००० पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या वाढून ९७३ ते ९८९ पर्यंत पोहोचली आहे.
‘या’ विमान कंपनीची रोकड संपली, पुढील दोन दिवसातील सगळी उड्डाणं रद्द
वाडिया समूहाची विमान कंपनी गो फर्स्ट दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. ज्या विमान प्रवाशांनी गो फर्स्ट एअरलाइन्सचे ३ आणि ४ मे रोजीचे तिकीट बुक केले आहे, त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. GoFirst ने ३ आणि ४ मे रोजीची उड्डाणे रद्द केली आहेत. तेल कंपन्यांची थकबाकी भरू न शकल्याने गो फर्स्ट विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.एका तेल विपणन कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, GoFirst कॅश आणि कॅरी मोडवर काम करीत आहे. म्हणजेच विमान कंपन्यांना त्यांना दररोज उड्डाण करायच्या संख्येनुसार हवाई इंधनाचे पैसे द्यावे लागतात. पेमेंट न केल्यास तेल कंपन्या इंधन पुरवठा बंद करू शकतो, यावरही एअरलाइन्स सहमत आहे. त्यामुळे GoFirst एअरलाइनच्या रोख प्रवाहावर गंभीर परिणाम झाला आहे. एअरबस A320 निओ विमानांसाठी इंजिन पुरवणारी कंपनी प्रॅट अँड व्हिटनीने इंजिन पुरवठा बंद केला आहे. इंजिन उपलब्ध होत नसल्यामुळे कंपनीची अर्ध्याहून अधिक विमाने उड्डाण करू शकत नाहीत. गो फर्स्ट एअरलाइन धोरणात्मक गुंतवणूकदारांच्या शोधात आहे. तसेच एअरलाइन्सही गुंतवणुकीसाठी अनेक गुंतवणूकदारांशी बोलत आहे.
शेतकरी पेन्शन योजना फ्लॉप?
मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात शेतकरी, कामगार आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी काही पेन्शन आणि इतर योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी २ योजना आहेत. त्यापैकी एक पीएम किसान आहे, ज्या अंतर्गत लहान आणि कष्टकरी शेतकऱ्यांना दरवर्षी ३ हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात. विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी आणखी एक पेन्शन योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. या अंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर ३ हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद आहे. यापैकी पीएम किसानची क्रेझ अजूनही आहे, परंतु प्रधानमंत्री किसान मानधन योजना फ्लॉप ठरण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा सहभागही कमी होत आहे, तर सरकारचेही याकडे फारसे लक्ष नाही; याशिवाय प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणि व्यापार्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना यांसारख्या पेन्शन योजनाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत.
SD Social Media
9850 60 3590