विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपने महाविकासआघाडीला जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत फक्त भाजपचा विजयच झाला नाही तर ते बहुमतापासून आता अवघ्या काही अंतरावर येऊन ठेपले आहेत. भाजपला विधानपरिषद निवडणुकीमध्ये एकूण 133 पहिल्या पसंतीची मतं पडली आहेत. यात राम शिंदे यांना 30, श्रीकांत भारतीय यांना 30, प्रविण दरेकर यांना 29, उमा खापरे यांना 27 आणि प्रसाद लाड यांना 17 मतं पडली आहेत. यातल्या उमा खापरे यांचं एक मत बाद झाल्यामुळे भाजपला मिळालेल्या पहिल्या पसंतीची मतं 134 एवढी आहे.
288 आमदारांची संख्या असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी 145 मतांची गरज आहे, म्हणजेच भाजप बहुमतापासून 11 मतं लांब आहे. विधानपरिषद निडणुकीमध्ये 285 आमदारांनी मतदान केलं. राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे जेलमध्ये असल्यामुळे तर शिवसेनेच्या एका आमदाराचं निधन झाल्यामुळे विधानसभेची संख्या 3 ने कमी झाली आहे.