मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. येथे रुग्णांची संख्या रोज वाढत असून रुग्णालये अपुरे पडू लागल्याचा दावा केला जात आहे. मात्र चीनमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी भारतात मात्र रोज आढळणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा १०० पेक्षा खाली गेला आहे. मार्च २०२० पासून सोमवारी पहिल्यांदाच नव्या करोनाग्रस्तांची संख्या १०० पेक्षा खाली गेली आहे. तसेच मार्च २०२० पासून पहिल्यांदाच सलग चार दिवस एकाही करोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.
देशात करोनाचा संसर्ग सध्या अटोक्यात आहे. शासकीय आकडेवारीनुसार देशात मार्च २०२० पासून पहिल्यांदाच नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा १०० पेक्षा खाली गेला आहे. तसेच २०२० पासून पहिल्यांदाच सलग चार दिवसांमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सोमवारी भारतात ८३ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. रविवारी हीच संख्या ११४ होती. याआधी भारतात १०० पेक्षा जास्त रुग्णसंख्येची नोंद २७ मार्च २०२० रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून रोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १०० पेक्षा खाली आलेली नव्हती.