ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला जळगाव नगरीचेचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम यांच्या श्रीराम मुक्ताई पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होते. वारकरी-धारकरी संगम म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम हा सोहळा. वारकरी सांप्रदाय म्हणजे पंढरपूर. तुकोबा, ज्ञानोबांची वारी, आणि धारकरी म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान शिवाजी संभाजी रक्तगटाची ललकारी.
जेंव्हा परकीय आक्रमण आले होते, देश, धर्म, सांप्रदाय नष्ट होत चालले होते. या उभ्या महाराष्ट्राला संपूर्ण भारत देशाला, कोणीच वाली नव्हते तेंव्हा छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले आणि त्यांनी अपार पराक्राम गाजवून, परकीयांना धूळ चारून देव, देश आणि धर्माच्या पाठीशी उभे राहून सर्वांचे रक्षण केले, साधुसंताना अभय दिले, ज्यांच्यामुळे पंढरीचा पाडुरंग, तुळजापूरची आई भवानी माता परकीय जाचातून मुक्त झाली याच शिवरायांचा नामघोष. त्यांच्या पराक्रमाची गाथा, त्यांचा धारकरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रूपाने जळगाव पंढरपूर दिंडीत सहभागी झाला होता.
जळगावात प्रथमच वारकरी-धारकरी संगमाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी पांडे डेअरी चौक भगवे ध्वज, रांगोळ्या, स्वागत फलक यांनी सजवण्यात आला होता. श्रीराम मुक्ताई पालखीचे पांडे चौकात आगमन होताच धारकांनी पुष्पवृष्टी करत समस्त वारकऱ्यांचे स्वागत केले. चौकात असलेल्या श्री शिवछत्रपती शिवाजी व संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व धर्म ज्वालेचे पूजन श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांनी केले. पालखीतील प्रभू श्रीराम उत्सवमूर्ती व संत मुक्ताईपादुका यांचे पूजन कपिल ठाकूर, रजत वाणी, विशाल जगदाळे, दीपक दाभाडे व उपस्थित धारकर्यांनी यांनी तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख आकाश फडे यांच्या हस्ते शिवचरित्र भेट देऊन महाराजांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ धारकरी शरद पवार यांनी सपत्नीक महाराजांचे पूजन केले.
पूजन स्वागता नंतर धारकरी वारकरी यांनी एकत्र ‘जय हरी विठ्ठल’, ‘हर हर महादेव’, ‘शिवाजी महाराजांचा विजय’ असो अशा घोषणा देत आसमंत भारून टाकला होता. प्रसंगी धारकरी वारकरी यांनी फुगड्या खेळत आनंद उत्सव साजरा केला. या देश आणि धर्मावरील संकटाला दूर कर, आम्हाला काही नको पण या हिंदुराष्ट्राच रक्षण कर, तूच माऊली तूच साऊली सकळांची, या झोपलेल्या देशाला महाराष्ट्राच्या तरुणाला पुन्हा जाग कर, हातात शिवनामाच शस्त्र आणि हृदयात शिवरायांच्या अभिमान जागव, देव, देश आणि धर्मासाठी जगायला आणि मरायला शिकव, अखंड हिंदुस्थान भगव्या झेंड्याखाली आन हेच मागणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरयांनी विठ्ठला, ज्ञानोबा, तुकोबा चरणी मागितले. असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जळगाव विभाग प्रमुख आकाश फडे यांनी कळवले आहे.