उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडसह पाच राज्यात पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या निवडणुका होणार की नाही याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची महत्वाची बैठक आज राजधानी दिल्लीत पार पडणार आहे. या बैठकीत सध्याच्या कोरोना स्थितीचा तसच ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटाचा आढावा घेतला जाईल. त्यानंतरच 5 राज्यातल्या निवडणूका घ्यायच्या की पुढं ढकलायच्या याचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अलिकडेच अलाहाबाद हायकोर्टानं मोदी सरकार तसच निवडणूक आयोगाला निवडणूका पुढं ढकलण्यावर विचार करावं असं सुचित केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे.
आजच्या बैठकीत निवडणूक आयुक्त तसेच आरोग्य मंत्रालयाचे टॉपचे अधिकारी सहभागी होणार आहेत. यात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून उत्तर प्रदेश, (Uttar Pradesh) उत्तराखंड,(Uttara Khand) गोवा, (Goa) पंजाब,(Panjab) मणिपूर (Manipur) ह्या पाच राज्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यातल्या त्यात ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटावर चर्चा होईल. ह्या बैठकीनंतरच पाचही राज्यात निवडणुका घ्यायच्या की काही काळासाठी पुढं ढकलायच्या याचा निर्णय होणार आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगानं आतापर्यंत गोवा, पंजाब, मणिपूर ह्या राज्यांचा दौरा करुन तिथल्या स्थितीचा आढावा घेतलेला आहे. आता उत्तर प्रदेशचा दौरा करुन निवडणूकपुर्व तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. त्याआधीच आजची महत्वाची बैठक पार पडतेय.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यातल्या निवडणुका पुढच्या वर्षात म्हणजे 2022 मध्ये होणार आहेत. त्यात पंजाबमध्ये तर काही पक्षांनी उमेदवारांची घोषणाही केलीय. उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह अशा नेत्यांच्या निवडणूकपुर्व सभाही सुरु झाल्यात. मोदींनी अलिकडेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोव्यात मोठ्या सभा घेतल्यात. याचाच अर्थ मुख्य पक्षांनी निवडणुकीचे ढोल वाजवायला कधीच सुरुवात केलीय. उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ हा मे महिन्यात संपतोय. तर पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूरचा कार्यकाळ हा मार्च महिन्यात संपतोय. पण गेल्या दोन आठवड्यापासून देशात मोठ्या प्रमाणात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडायला सुरुवात झालीय. डेल्टापेक्षा हा विषाणू तिप्पट वेगानं लागण होते. त्यामुळे निवडणुकांचं भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीकडं सर्वांचं लक्ष लागलंय.