विश्वविजेता बनवून आॕस्ट्रेलियाचा हेड बनला हेडमास्टर ,१४० कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले
ट्रेव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले आणि वर्ल्ड कप जिंकला. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा संघ २४० धावांवर ऑल आऊट झाला होता. यावेळी ट्रेव्हिसच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामान सहजपणे जिंकला आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने यावेळी भारतावर सहा विकेट्स राखून विजय मिळवला.मोहम्मद शमीने पुन्हा एकदा आपल्या पहिल्या षटकात भारताला विकेट मिळवून दिली. शमीने डेव्हिड वॉर्नरला बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराने मिचेल मार्श आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांना बाद केले. त्यामुळे पहिल्या पॉवर प्ले मध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर अंकुश ठेवला होता. कारण भारताने सात षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाची ३ बाद ४७ अशी अवस्था केली होती. त्यानंतर भारताचे फिरकी गोलंदाज संघाला विकेट्स मिळवून देतील, असे वाटत होते. पण रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी यावेळी अपेक्षाभंग केला. कारण ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकी भागीदारी रचली आणि त्यामुळे त्यांना विजयासमीप पोहोचता आले. हेडने तर यावेळी दमदार शतक झळकावले आणि आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. हे दोघे ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून देणार असे वाटत होते.
प्रथम फलंदाजी करताना भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्माने धडाकेबाज फटकेबाजी करत ४७ धावांची खेळी साकारली. त्यानंतर विराट कोहलीने ५४ धावांची खेळी साकारली आणि पुन्हा एकदा दमदार खेळी साकारली. पण अर्धशतकानंतर तो जास्त काळ टिकू शकला नाही. कोहलीला यावेळी फायनलमध्ये शतक झळकावण्याची संधी होती. पण यामध्ये तो अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. कोहली बाद झाला आणि भारताला संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळी लोकेश राहुल भारताच्या मदतीला धावून आला. कारण राहुलने संयत खेळी करत यावेळी फक्त एकाच चौकाराच्या जोरावर ६६ धावा केल्या. त्यामुळे भारताला यावेळी २०० धावांचा पल्ला गाठता आला. अखेरच्या षटकांत भारताला मोठी फटकेबाजी करता आली नाही आणि त्यामुळेच त्यांना २४० धावांवर समाधान मानावे लागले.भारतीय संघ या सामन्यात मोठी धावसंख्या उभारेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण या सामन्यात फलंदाजांनी साफ निराशा केली आणि त्यामुळेच त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
हलाल प्रमाणित उत्पादनांतून देशविरोधी कारवाया? युपी सरकारचा मोठा निर्णय
हलाल प्रमाणित उत्पादनांवर सातत्याने वाद निर्माण होत आहेत. आता उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राज्यात हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. राज्यात तेल, साबण, टूथपेस्ट यासारख्या हलाल प्रमाणित शाकाहारी उत्पादनांच्या विक्रीची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितले आहे. शनिवारी संध्याकाळी, यूपी सरकारने राज्याच्या हद्दीत हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला.
गाझात युद्धविराम? इस्रायल, अमेरिका आणि हमासमध्ये झालेल्या सहापानी करारात काय ठरलं?
इस्रायलकडून गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागात हल्ले चालूच आहेत. इस्रायलचे लष्कर शिफा रुग्णालयाच्या तळात असलेल्या ‘हमास कमांड सेंटर’चा मागोवा घेत आहे. इस्रायलने केलेल्या आरोपानुसार हा तळ हमास रुग्णालयाच्या तळघरात आहे. मात्र, ‘हमास’ आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी असे कोणतेही कमांड सेंटर येथे नसल्याचे स्पष्ट केले आहे. गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले सुरू असल्याने येथे मानवतावादी मदत पोहोचू शकत नाही. परिणामी अनेक नागरिक मुलभूत सुविधांपासूनही वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर इस्रायलने युद्धविश्रांती घ्यावी अशी मागणी जगभरातून केली जात होती. या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा करार झाल्याचं इंडियन एक्स्प्रेसने वॉशिंग्टन पोस्टच्या हवाल्यानुसार म्हटलं आहे.
ऊस उत्पादकांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा २६ तारखेला राष्ट्रीय महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा
मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील उपस्थित असून कोल्हापुरातून हातकणंगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रस्ता रोको करत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उसाच एक कांडक देखील कारखान्याला जाऊ देणार नाही आणि हे पैसे घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
भारताचे लष्कर माघारी घ्या! मालदीवच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचे औपचारिक निर्देश
मालदीवचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहमद मुइझ्झू यांनी शनिवारी भारतीय लष्कराचे त्या देशात असलेले जवान परत बोलाविण्याचे औपचारिक निर्देश दिले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मालदीवची राजधानी माले येथे मुइझ्झू यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या कार्यालयाने याबाबत माहिती दिली. तर जवानांना परत बोलाविण्याबाबत ‘चर्चेतून तोडगा’ काढण्याचे ठरल्याचा दावा केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे.
राज्यपालांनी परत पाठवलेली दहा विधेयके तमिळनाडू विधानसभेकडून पुन्हा मंजूर
तमिळनाडू विधानसभेने शनिवारी राज्यपालांनी नुकतीच मंजुरीविना परत पाठवलेली सर्व दहा विधेयके पुन्हा मंजूर केली. राज्यपाल रवी यांनी १३ नोव्हेंबर रोजी विधि, कृषी आणि उच्च शिक्षणासह विविध विभागांशी संबंधित ही विधेयके मंजुरीविना पुनर्विचारार्थ परत पाठवली होती. ही विधेयके विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पुन्हा मंजूर करण्यात आली.
उत्तराखंडमध्ये मजुरांचे बचावकार्य ठप्प; बोगद्यात ४१ कामगार अडकल्याचे स्पष्ट
सिल्क्यारा बोगद्यातील कोसळलेला ढिगारा फोडून अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी मार्ग तयार करण्याचे काम शुक्रवारपासून ठप्प झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. तर या बोगद्यात अडकलेल्या मजुरांची संख्या ४० ऐवजी ४१ असल्याची माहिती अधिकृतरीत्या देण्यात आली. बचावकार्यातील अडथळय़ांमुळे मजुरांच्या सुटकेसाठी प्रतीक्षा आणखी लांबली आहे.
बॉलिवूडला मोठा धक्का, लोकप्रिय दिग्दर्शकाचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन
धूम आणि धूम २ या सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक संजय गढवी यांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या संजय गढवी यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. मॉर्निंग वॉकदरम्यान, त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही.
रशियामध्ये एलजीबीटीक्यू समुदायाला अतिरेकी ठरवण्यासाठी हालचाली!
रशियाच्या न्याय मंत्रालयाने नुकतीच सर्वोच्च न्यायालयात एलजीबीटी समुदायाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. आंतरराष्ट्रीय एलजीबीटी समुदायाच्या कृती अतिरेकी स्वरूपाच्या आहेत, असे रशियन सरकारचे म्हणणे आहे. सरकारला पूर्ण समुदायाबाबतच आक्षेप आहे की विशिष्ट संघटनेबाबत, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. येत्या ३० नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
मजुराचं नशीब पालटलं, यूएईमध्ये भारतीयाने ४५ कोटी जिंकले
संयुक्त अरब अमिरातमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाचं नशीब चमकलं आहे. एका कंपनीच्या कंट्रोल रूममध्ये ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या श्रीजू हा एका रात्रीत कोट्यधीश झाला आहे. केरळमधील रहिवासी असलेल्या श्रीजूने नुकतीच सॅटर्डे मिलियन्स नावाची लॉटरी जिंकली आहे. त्याला ४५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. ३९ वर्षीय श्रीजू गेल्या ११ वर्षांपासून फुजैरामध्ये राहतात आणि काम करत आहेत. दुबईपासून फुजैराह ११० किलोमीटर अंतरावर आहे. १५ नोव्हेंबरला सॅटर्डे मिलियन्सची १५४ वी सोडत जाहीर करण्यात आली.
अखेर अनिल अंबानींच्या कर्जात बुडालेल्या कंपनीची विक्री
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अनिल अंबानी यांच्या कर्जात बुडालेल्या रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या रिझॉल्युशन प्लॅनला मंजुरी दिली आहे. यामुळं हिंदुजा ग्रुपची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेडला रिलायन्स कॅपिटलच्या अधीग्रहणाचा मार्ग मोकळा झाला आहे. रिलायन्स कॅपिटलच्या अधीग्रहणाला हिंदुजा ग्रुपला आरबीआयकडून एनओसी मिळाली आहे. हिंदुजा ग्रुपच्या आयआयएचएलनं एप्रिलमध्ये झालेल्या लिलावाच्या दुसऱ्या फेरीत रिलायन्स कॅपिटल खरेदी करण्यासाठी सर्वाधिक ९६५० कोटी रुपयांची बोली लावली होती. आरबीआयनं २९ नोव्हेंबर २०२१ ला विविध गंभीर त्रुटींमुळं रिलायन्स कॅपिटलचं बोर्ड बरखास्त केलं होतं.
रायगडचे समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले
दिवाळी निमित्त लोक फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. मुंबई पुण्यापासून जवळ असलेले रायगडचे किनारे सलग सुट्यांमुळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. अलिबागसह मुरुड, काशीद, नागाव, दिवेआगर, श्रीवर्धनच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी दिसून येत आहे.सलग चार दिवस सुटटी मिळाल्याने लोकांनी फिरायला जाण्याचा बेत आखला. त्यासाठी रायगडच्या किनाऱ्यांना मोठी पसंती दिल्याचे पहायला मिळते. मुंबईहून जवळ असलेल्या तसेच मिनी गोवा म्हणून पर्यटकांची प्रमुख पसंती असलेल्या अलिबाग व मुरुडकडे वेळेची व इंधनाची बचत करत मांडवामार्गे जलप्रवासाने पर्यटक दाखल झाले आहेत. सागरी सफरीचा आनंद घेत इथं आलेले पर्यटक मनसोक्त हुंदडत इथल्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत आहेत. समुद्र स्नानाबरोबरच एटिव्ही राईड, जेट स्की, बनाना राईड यासारख्या वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत आहेत. ताज्या मासळी वर ताव मारत आहेत. उंट सवारी घोडा गाडी यामुळे बच्चेकंपनीही खुश आहे.
SD Social Media
9850603590