आज दि.२० नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवत मिचेल मार्श थाटात बसला, पॅट कमिन्सने शेअर केला फोटो

रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव करून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियन संघाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एक असा फोटो आहे की ते पाहून सगळेच थक्क झाले. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मिचेल मार्श वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर पाय ठेवून बसला आहे. हे पाहून सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन खेळाडूवर खूप टीका होत आहे.मुख्य बाब म्हणजे मिचेल मार्शचा हा व्हायरल झालेला फोटो स्वतः ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यानंतर मार्शनेही तो फोटो रिपोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मार्शच्या पायाखाली वर्ल्डकप ट्रॉफी असून तो सोफ्यावर आरामात बसला आहे आणि त्याने ट्रॉफीवर पाय ठेवले आहेत. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक ट्रॉफी उचलल्यानंतर काही तासांनी हा फोटो शेअर करण्यात आला. फोटो हॉटेलच्या खोलीतील दिसत आहे जिथे ऑस्ट्रेलियन संघ बसून एकमेकांशी निवांतपणे बोलत होते आणि त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करत होते. रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये यजमान भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना झाला. या सामन्यात कांगारू संघाने भारतावर ६ विकेटसने विजय मिळवला.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २१ नोव्हेंबरला ब्लॉक; २ तास वाहतूक पूर्णत: बंद राहणार

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी ३५/५०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. त्यामुळे दि. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत या लांबीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने द्रुतगती मार्गाच्या कि.मी ०८/२०० येथील शेडूंग फाटा येथून वळवून रा.म.मा. क्र. ४८ जुना मुंबई पुणे महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट कि.मी. ४२/१०० येथून पुन्हा द्रुतगती मार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येणार आहे. तसेच गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.

‘हिंदूराष्ट्रा’साठी घटनेत दुरुस्ती करा, धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांची सनसनाटी मागणी

 ‘सनातन भारतीय संस्कृती व हिंदू एकता दृढ करण्यासाठी आम्ही ‘दरबार’ भरवतो. त्यावर कोणाला आक्षेप असल्यास त्यांनी दरबारात येऊन म्हणणे मांडावे. आमने-सामने करून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या, पण कारणे सांगू नका,’ अशा शब्दांत धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला उलटे आव्हान दिले. ‘राजकारण्यांनी जनतेला ‘बाबा’ मानले, तरच निवडणुका जिंकता येतील,’ असेही त्यांनी आपल्या भक्त राजकारण्यांना सुनावले. त्याचवेळी ‘भारतीय राज्यघटनेत आतापर्यंत सव्वाशे वेळा दुरुस्त्या झाल्या असून, एकदा हिंदूराष्ट्र निर्मितीसाठीही दुरुस्ती केली पाहिजे,’ अशी भूमिका बागेश्वर धाम सरकार यांनी मांडली.

श्रेयस तळपदेचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसोबत करणार काम

मुंबई- अभिनेता श्रेयस तळपदेने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या अनेक मालिका आणि सिनेमे नेहमीच सुपरहिट होतात. याशिवाय गेल्या वर्षी रिलीज झालेल्या पुष्पा या सिनेमासाठी हिंदीमध्ये त्याने अल्लू अर्जूनच्या आवाजासाठी त्याने डब केले होते. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील यश या भूमिकेने तर तो मराठी प्रेक्षकांच्या मनातील ताईतच बनला. आता श्रेयस पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेश्रकांच्या भेटीला येत आहे.दिवाळीच्या मुहूर्तावर श्रेयसने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली. अजाग्रत असे त्याच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. हा एक रहस्यमय सिनेमा असेल. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रेयससोबत माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी, कन्नड अभिनेत्री राधिका कुमारस्वामी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळेल. शशिधर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून हा त्यांचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. या चित्रपटाच्या सेटचे काम सध्या जोरदार सुरु आहे. चित्रपटाचे लोकेशन अगदी नैसर्गिक वाटावे यासाठी जोरदार काम सुरु आहे.

ठिपक्यांची रांगोळी मालिकेने घेतला निरोप

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेला गेली २ वर्षे प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. मालिकेचा विषय आणि त्याचे शिर्षक थोडे हटके असल्यामुळे प्रेक्षकवर्ग आपसुकच मालिकेकडे आकर्षित झाला. त्यानंतर मालिकेतील कलाकरांच्या अभिनयाच्या सर्वचजण प्रेमात पडले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगारात होणार बंपर वाढ

दिवाळीचे दिवस केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचे ठरले. दिवाळीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA म्हणजे महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. पण, आता आणखी एक अपडेट केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित करू शकते. दिवाळीनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात दोन मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्यासाठी धमाकेदार होऊ शकते.आगामी नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक नव्हे तर दोन आनंदवार्ता घेऊन येईल. नवीन वर्षात (२०२४) केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा महागाई भत्ता म्हणजे DA वाढीची भेट मिळेल, पण त्यासोबत त्यांचा घरभाडे भत्ता (HRA) देखील वाढणार असेल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता प्रत्येक सहामहित वाढला जातो. जुलै ते डिसेंबर सहामाहीत ऑक्टोबर २०२३ मध्ये शेवटची DA वाढ करण्यात आली होती. महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढून ४२% वरून ४६ टक्क्यांवर पोहोचला.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या कसिनोतील फोटोवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊतील कसिनोत बसलेला फोटो शेअर केला. तसेच महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा आरोप केला. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राऊतांच्या या पोस्टवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी या पोस्टमधून राऊतांची विकृत मानसिकता दिसते, असा हल्लाबोल केला. ते सोमवारी (२० नोव्हेंबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून दिसत आहे. ते किती उताविळ झालेत हेही त्यातून दिसतं.चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्या हॉटेलला थांबले होते. त्यांनी जेथे जेवण केलं ते रेस्टॉरंट आणि बाजूचं केसिनो हे एकत्र होतं.”

अर्जेंटिनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत हावीर मिली यांनी मारली बाजी

दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक तसेच अतिउजव्या आघाडीचे नेते जेवियर मिली यांनी बाजी मारली आहे. रविवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. मध्यम-डाव्या विचारसरणीचे विद्यमान अर्थमंत्री सर्जिओ मास्सा आणि मिली यांच्यात लढत होती. मात्र मास्सा या लढतीत पराभूत झाले.

शेखावटी प्रदेशातील जाटांचा कौल भाजपसाठी निर्णायक

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची संधी न मिळाल्यामुळे जाट समाज नाराज असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जाटांचे हितसंबध जपले नसल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असून भाजपच्या जाट उमेदवारांमुळे शेखावटी प्रदेशातील लढाई अधिक चुरशीची झाली आहे.राजस्थानमधील १० जिल्ह्यांतील ५० हून अधिक मतदारसंघांमध्ये जाट समूहाचे प्रभुत्व आहे. शेखावटी प्रदेशातील अजमेर, अलवर, चुरू, जयपूर, झुंझुनू, नागौर आणि सिकर या जिल्ह्यांमध्येही जाट निर्णायक असून अनेक मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात जाट उमेदवार दिले आहेत. त्यामुळे यावेळी जाट कोणाला पाठिंबा देतील यावर भाजपचा सत्ता मिळण्याचा मार्ग सुकर होईल असे मानले जाते.

गौतम सिंघानियाच्या पत्नीनं घटस्फोटासाठी ठेवली मोठी अट

दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी उद्योगपती आणि रेमंड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, एमडी गौतम सिंघानिया यांच्या घटस्फोटाची बातमी आली आहे. लग्नाच्या ३२ वर्षांनंतर ते पत्नी नवाज मोदी सिंघानियाला घटस्फोट देणार आहेत. त्यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी मोठ्या अटी ठेवल्या आहेत आणि गौतम सिंघानिया यांच्याकडे त्यांच्या एकूण संपत्तीपैकी ७५ टक्के रक्कम मागितली आहे.गौतम सिंघानिया यांची एकूण संपत्ती १.४ अब्ज डॉलर (सुमारे ११,६६० कोटी रुपये) आहे. या संदर्भात नवाज मोदी सिंघानिया यांनी घटस्फोटाच्या बदल्यात सिंघानिया कुटुंबाकडे ८७४५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. ईटीने दिलेल्या वृत्तानुसार, नवाज मोदी सिंघानिया यांनी ही रक्कम स्वतःसाठी आणि त्यांच्या दोन मुली निहारिका आणि नीसा यांच्यासाठी मागितली आहे.

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.