काळं फासल्यानंतर नामदेवराव जाधव आक्रमक, शरद पवारांसह रोहित पवार निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी लेखक नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे काळं फासलं. नामदेवराव जाधव यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचा खोटा दाखला समोर आणला होता. तसेच त्यांनी शरद पवारांवर आरोप केले होते. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुरावे देण्याची मागणी केली होती. तसेच, पुण्यातील त्यांचे कार्यक्रम उधळून लाववण्याचा इशारा दिला होता. पुण्यातील नवी पेठ येथील पत्रकार भवन परिसरात राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला काळं फासलं. या प्रकरणानंतर जाधव यांनी फेसबुक लाइव्ह करत पुन्हा एकदा शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
कांदा, शेवगा कडाडलेलाच, सणासुदीत आवक घटली; इतर भाज्यांचे दर स्थिर
कांदा, शेवगा तसेच आल्याचे दर चढेच आहेत आणि सणासुदीत आवक कमी झाल्याने हे दर पुन्हा जास्त वाढल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र इतर बहुतांश भाज्यांचे दर स्थिर आहे. त्यातल्या त्यात पालेभाज्यांचे दर फळभाज्यांपेक्षा कमी असल्याने सणासुदीत नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.जाधववाडीच्या बाजारात नऊ नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळीपूर्वी कांद्याची २२८० क्विंटल आवक होऊन ९०० ते ३३०० रुपये क्विंटलने ठोक विक्री झाली होती. तर, गुरुवारी (१६ नोव्हेंबर) १३४९ क्विंटल आवक होऊन २२०० ते ४७०० रुपये क्विंटलने ठोक विक्री होऊन ७० ते ८० रुपये किलोने किरकोळ विक्री झाली. साहजिकच आवक सुमारे एक हजार क्लिंटलने कमी झाली आणि ठोकचे भावदेखील क्विंटलमागे एक हजार रुपयांनी वाढल्याचे स्पष्ट झाले. कांद्याप्रमाणेच शेवग्याच्या शेंगांची स्थिती आहे. नऊ नोव्हेंबर रोजी १४ क्विंटल शेवग्याची आवक होऊन ३००० ते ६२०० रुपये क्विंटलने ठोक विक्री झाली होती, तर गुरुवारी नऊ क्विंटल आवक होऊन ७००० ते ११००० रुपये क्विंटलने ठोक विक्री झाली.
दादा भुसे छगन भुजबळ यांच्या घरी, बंद दाराआड अर्धा तास चर्चा, भेटीचं कारण समोर
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे नाशिकचे माजी पालकमंत्री व सध्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी आज भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी छगन भुजबळ आणि दादा भुसे यांच्यात बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली. दादा भुसे हे पालक मंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी भुजबळ फार्म या ठिकाणी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि महानगर प्रमुख बंटी तिदमे हे देखील उपस्थित होते.
सातारा : जरांगे-पाटील यांनी घेतली उदयनराजे – शिवेंद्रसिंहराजेंची भेट
मराठा आरक्षणासाठी दौऱ्यावर असणारे मनोज जरांगे-पाटील यांनी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. दोघांनीही त्यांचे स्वागत केले. सातारा येथे गांधी मैदानावर आज शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणासाठी सभा झाली. यावेळी सातारकरांनी त्यांचे मोठे स्वागत केले. या सभेस खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित नव्हते. मात्र त्यांचे कार्यकर्ते सहभागी होते. सभेनंतर जरांगे पाटील यांनी उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली.
सीओपीडी श्वसन विकार मृत्यूचे कारण ठरणारा जगातील तिसरा आजार – डॉ. अनिल मडके
सीओपीडी म्हणजे दीर्घ कालावधीसाठी श्वसनास अडथळा आणणारा फुप्फुसांचा चिवट विकार. जगभरातील एकूण मृत्यूच्या आकडेवारीत आज सीओपीडीचा तिसरा क्रमांक लागतो. नियमित औषधोपचार , सकस आहार, डसनाचा व्यायाम, तणावरहित जीवनशैली याशिवाय तज्ञ डॉक्टरांचा विनाविलंब सल्ला, त्यांनी दिलेली औषधे नियमितपणे आणि वेळेवर घेतल्यास सीओपीडीमुळे होणारा त्रास आटोक्यात राहू शकतो, असे मत छातीरोग विशेषतज्ज्ञ डॉ.अनिल मडके यांनी व्यक्त केले.
जाती व्यवस्थेविरुध्द साहित्यिकांनी आज बोलण्याची गरज – रामदास फुटाणे
जाती व्यवस्थेविरूध्द साहित्यिकांनी आज बोलण्याची गरज आहे. शाळेत खिचडी वाटप करीत असतानाही जात नोंदवणे ही विकृती असून यातून भयानक भविष्य निर्माण होईल असे वक्तव्य भाष्यकवी रामदास फुटाणे यांनी केले. कवी भीमराव धुळूबुळू यांच्या ‘काळजाचा नितळ तळ’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन शुक्रवारी सायंकाळी सांगलीत एका कार्यक्रमात श्री. फुटाणे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पत्रकार विजय चोरमारे होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले, आज स्वातंत्र्याला शंभर वर्षे झाली तरी जात नोंदवली जाते. या व्यवस्थेविरूद्ध साहित्यिकांनी उघडपणे बोलण्याची आणि लिहिण्याची आज गरज आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष याबाबत काहीच बोलत नाहीत ही शोकांतिका आहे. यावेळी त्यांनी काही भाष्यकविता सादर केल्या. काळजाचा नितळ तळ या काव्य संग्रहामध्ये मध्यमवर्गियांची होत असलेली घुसमट सोप्या शब्दात मांडली आहे.
मुलगा प्रदेशाध्यक्ष, निष्ठावंताला विरोधी पक्षनेतेपद; येडियुरप्पा यांचा पुन्हा एकदा कर्नाटक भाजपामध्ये वरचष्मा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी कर्नाटक भाजपाने अद्याप विधानसभा विरोधी पक्षनेते ठरविला नव्हता. गेल्या अनेक काळापासून रिक्त असलेले प्रदेशाध्यपदी नेता निवडल्यानंतर आता माजी उपमुख्यमंत्री आणि सात वेळा आमदार असलेले आर. अशोका यांना शुक्रवारी विरोधी पक्षनेता म्हणून घोषित करण्यात आले. कर्नाटक विधानसभेत भाजपाचे ६६ आमदार आहेत. भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी ६५ वर्षीय अशोका यांची विरोधी पक्षनेत्यापदी एकमताने निवड केली. अशोका हे वोक्कलिगा समाजाचे नेते असून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांचे नाव सुचविले आणि माजी मंत्री व्ही. सुनील कुमार यांनी त्याला अनुमोदन दिले. दोन्ही नेत्यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी अनेक नेत्यांची नावे पुढे केली होती. मात्र अखेरीस सहा महिन्यांनी अशोका यांची निवड झाली.
कला इतिहासकार बी. एन. गोस्वामी यांचे निधन
विख्यात कला इतिहासकार आणि लेखक ब्रिजेंदर नाथ गोस्वामी यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांना फुप्फुसाच्या संसर्गावर उपचारासाठी चंडीगड येथील रुग्णालयात दाखल केले होते. बी एन गोस्वामी यांच्या पश्चात मुलगी मालविका आहे. त्यांची पत्नी करुणा याही कला इतिहासकार होत्या. गोस्वामी यांनी पहाडी शैलीच्या चित्रकलेवर विपुल प्रमाणात संशोधन केले होते. या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. १९५८ मध्ये सनदी सेवेतील प्रतिष्ठेची नोकरी सोडून त्यांनी संशोधन आणि लेखनासाठी कारकीर्द घडवली. पहाडी चित्रे, लघुचित्रे, दरबारी चित्रे आणि भारतीय चित्रे या विषयाला वाहिलेली २६ पेक्षा जास्त पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. कला, साहित्य आणि भाषणांमध्ये मांजरांनी विविध प्रकारे पटकावलेले स्थान या विषयावरील ‘द इंडियन कॅट : स्टोरीज, पेंटिग्ज, पोएट्री अँड प्रोव्हर्ब’ हे त्यांचे सर्वात अलिकडील पुस्तक २०२३ मध्ये प्रकाशित झाले होते.
फायनलपूर्वी रोहित-कमिन्सने ट्रॉफीबरोबर काढले फोटो
एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत आमनेसामने असणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी फोटो सेशन केले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स यांनी अहमदाबादमधील ऐतिहासिक वारसास्थळावर ट्रॉफीसोबत फोटो सेशन केले.ही ट्रॉफी कोणाकडे जाणार याचा निर्णय रविवारी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा विश्वचषक जिंकला आहे, तर टीम इंडियाने दोनदा हे विजेतेपद पटकावले आहे. विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून विजेतेपद पटकावले होते.
पीएम नरेंद्र मोदींबरोबर ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान पाहणार फायनल सामना, कपिल देव-धोनीही राहणार उपस्थित
एकदिवसीय विश्वचषक २०२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. रविवारी होणारा हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्टेडियममध्ये पोहोचणार आहेत. होय, गेल्या दोन दिवसांपासून बातम्यांमधून ही चर्चा सुरु होती. पण, आता या ऐतिहासिक फायनलचा आनंद घेण्यासाठी पीएम मोदी स्टेडियममध्ये पोहोचणार असल्याचे निश्चित झाले आहे. पीएम फायनलमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी अहमदाबादला पोहोचणार आहेत. त्यांच्याबरोबर हा सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स हे देखील दिसतील.आसाम आणि मेघालयसह दोन ते तीन राज्यांचे मुख्यमंत्रीही विश्वचषकाचा फायनल सामना पाहण्यासाठी सहभागी होणार आहेत.भारताचा पहिला विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवही हा सामना पाहण्यासाठी येणार आहेत. त्यांच्याशिवाय २०११ मध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवणारा महेंद्रसिंग धोनीही स्टेडियममध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर इतर संघाचे विश्वचषक विजेते कर्णधारही उपस्थित राहणार आहेत.
बिग बींबरोबर जाहिरातीत झळकल्यानंतर हेमांगी कवीची हिंदी मालिकेत वर्णी
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा सर्वच माध्यमांत हेमांगीने काम केलं. काही दिवसांपूर्वी हेमांगी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एका जाहिरातीत झळकली होती. त्यानंतर आता हेमांगीची एका लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. तिने स्वत: याबद्दलची माहिती दिली.हेमांगी कवीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत हेमांगी ही अभिनेत्री सृष्टी झा बरोबर स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ असे या हिंदी मालिकेचे नाव आहे.
प्राचीन नाणी अन् मौल्यवान रत्नांचा खजिना सापडला, नाण्यांवर देवतांचे चित्र
पुरातत्वशास्त्रज्ञांना प्राचीन रोमन नाणी आणि रत्नांचा खजिना सापडला आहे. सापडलेल्या नाण्यांची संख्या ३००० पेक्षा जास्त आहे. तर ५० रत्नं देखील सापडली आहेत, त्यापैकी अनेकांवर प्राचीन रोमन देवतांच्या प्रतिमा आहेत. ही सर्व नाणी चांदी आणि पितळाची आहेत. जी पाहून पुरातत्वशास्त्रज्ञांचे डोळे चकाकले आहेत. सध्या घटनास्थळी उत्खनन सुरू असून, आणखी काही गोष्टी सापडण्याची शक्यता आहे.लाइव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार, पुरातत्वशास्त्रज्ञांना उत्तर इटलीमध्ये हा खजिना सापडला आहे. इटालियन संस्कृती मंत्रालयाच्या निवेदनानुसार, आधुनिक काळातील बोलोग्ना जवळील एक रोमन शहर क्लॅटरने या नावाने ओळखल्या जाणार्या क्लेटरना येथे उत्खननादरम्यान हा खजिना सापडला आहे.
SD Social Media
9850603590