दिल्लीने 3 गडी राखून चेन्नईला दिली मात

इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 (IPL 2021) व्या हंगामातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या दोन्ही संघामध्ये 50 वा सामना पार पडला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवलेल्या या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (DC vs CSK) हे संघ आमने सामने होते. अत्यंत चुरशीचा झालेला हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंच गेला. पण अखेर दिल्लीने 3 गडी राखून गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या चेन्नईला मात देत सामना जिंकला.

सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने गोलंदाजी निवडली होती. जो निर्णय दिल्लीने बरोबर करत चेन्नई संघाला अवघ्या 136 धावांत आटोपलं. दिल्लीकडून अक्षर पटेलने 2 तर आवेश खान, नॉर्खिया आणि आश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला. पण सर्वच गोलंदाजनी अतिशय कमी धावा देत चेन्नईला 136 धावांवर रोखलं.

चेन्नईचे सलामीवीर फाफ डुप्लेसी आणि ऋतुराज गायकवाड यांनी संपूर्ण हंगामात अप्रतिम कामगिरी केली आहे. पण आजच्या सामन्यात दोघंही स्वस्तात तंबूत परतले. संपूर्ण संघात सर्वाधिक धावा अनुभवी खेळाडू अंबाती रायडूने केल्या. त्याने 5 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 55 धावा झळकावल्या. त्याला धोनीने 18 धावांची मदत केली. तर उथाप्पाने देखील 19 धावा केल्या. ज्याच्या जोरावरच चेन्नईचा संघ किमान 136 धावा करुन दिल्लीसमोर 137 धावांचे आव्हान ठेवू शकला.

सामन्याची खेळपट्टी गोलंदाजीच्या दृष्टीने उत्तम असल्याने दिल्लीचे बहुतेक फलंदाजही सामन्यात अपयशी ठरले. केवळ शिखर धवनने महत्त्वपूर्ण 39 धावा केल्या. ज्याला सुरुवातीला पृथ्वीने 18 आणि मध्यंतरी पंतने 18 धावांची साथ दिली. पण हे सगळे बाद झाल्यानंतर सामना चेन्नईच्या बाजूने झुकु लागला. पण वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हीटमायरने नाबाद 28 धावा ठोकत सामना दिल्लीच्या बाजूने वळवला. विशेष म्हणजे शेवटच्या 3 चेंडूत 2 धावांची गरज असताना फलंदाजीला आलेल्या रबाडाने चौकार लगावत सामना दिल्लीला 3 विकेट्सनी जिंकून दिला. या रोमहर्षक विजयानंतर दिल्लीच्या हीटमायरने मैदानावर जल्लोष केला.

सामना सुरु होण्यापूर्वी चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघानी 12 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले असले तरी चेन्नईने अधिक नेट रनरेटच्या जोरावर पहिलं स्थान मिळवलं होतं. पण आता दिल्लीने चेन्नईला नमवत 13 सामन्यांपैकी 10 सामने जिंकत 20 गुण खात्यात मिळवले आहेत. ज्यामुळे ते गुणतालिकेतही पहिल्या स्थानी पोहोचले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.