कायद्याचे उल्लंघन करून जरांगेंची पहाटे चार वाजता सभा
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा करमाळा तालुक्यातील वांगी येथे पार पडली. कायद्याचे उल्लंघन करून पहाटे चार वाजता सभा घेण्यात आली होती. परंतु याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही आणि संबंधितांवर गुन्हा दाखल केला नाही. यासंदर्भात करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्याशी संपर्क साधला असता काहीही बोलण्यास नकार देत त्यांनी कानावर हात ठेवले.जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण प्रश्नावर दुसऱ्यांदा आरंभलेले आमरण उपोषण शासनाला आणखी मुदत देत मागे घेतले. त्यानंतर त्यांनी राज्यभर दौरा काढून जाहीर सभांचा झंझावात सुरू केला आहे. त्यांची जाहीर सभा करमाळा तालुक्यातील वांगी (क्र. १) येथे पहाटे चार वाजता झाली. तत्पूर्वी, शेजारच्या धाराशिव जिल्ह्यात वाशी येथेही मध्यरात्री त्यांची सभा झाली. वास्तविक पाहता रात्री दहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी जाहीर सभा घेण्यास आणि ध्वनिक्षेपण यंत्रणेसह वाद्ये वाजविण्यास आणि फटाके फोडण्यास ध्वनिप्रदूषण विरोधी कायद्यानुसार पूर्णतः बंदी आहे. या कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्याही सूचना आहेत.
“…म्हणून छगन भुजबळ समाजांमध्ये भांडणं लावण्याचं पाप करतायत”, संभाजीराजे छत्रपतींचा आरोप
शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यातल्या कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या मराठा कुटुंबांचा कुणबी जातप्रमाणपत्रासह ओबीसी आरक्षणात समावेश होणार आहे. परंतु, अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी या आरक्षणास विरोध केला आहे. कुणबी जातप्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
काशी वीरशैव जगद्गुरूंकडून प्रणिती शिंदेंना कौतुकासह खासदारकीसाठी शुभेच्छा
काशीच्या जंगमवाडी वीरशैव मठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुक्त कंठाने प्रशंसा करीत सोलापूरचा विकास केवळ शिंदे हेच करू शकतात, असा विश्वास व्यक्त करीत, त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे भविष्यात लोकसभेत पाहायला आपणांस नक्कीच आवडेल, अशा शब्दात जगदूगुरूंनी शुभेच्छाही दिल्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
राज्याचे १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा
राज्याची मंत्रिमंडळ बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णयांवर चर्चा झाली. तसंच, राज्याची अर्थव्यवस्थेचे १ ट्रिलिअन डॉलर्सचे उद्दीष्ट्य गाठण्याच्या उद्देशानेही आजची बैठक महत्त्वाची ठरली.
इस्रायल-हमास युद्धाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जगाला संदेश
गेल्या ४१ दिवसांपासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध चालू आहे. या युद्धावर जागतिक नेते लक्ष ठेवून आहेत. हे नेते सातत्याने युद्धावर आणि युद्धाच्या परिणामांवर बोलत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंदेखील या युद्धावर लक्ष आहे. दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ समिटच्या उद्घटनाच्या सत्रातही नरेंद्र मोदी यांनी या युद्धावर भाष्य केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी हिंसा आणि दहशतवादाविरोधात भारताच्या कठोर भूमिका मांडल्या. तसेच इस्रायल-हमास युद्धामुळे पश्चिम आशियात वाढलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्व देशांमध्ये एकता आणि सहकार्य असण्याची आवश्यकता असल्याचं मोदी यांनी यावेळी अधोरेखित केलं. तसेच ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला.
४० हजार कोटींची कर्जमाफी, मोफत वीज, शिक्षण व आरोग्य सुविधा
छत्तीसगडमध्ये आज (१७ नोव्हेंबर) दुसऱ्या टप्प्यात ७० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी २० मतदारसंघांत मतदान पार पडले. सत्ताधारी काँग्रेसने आपली सत्ता कायम राहावी यासाठी जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली आहेत. जसे की, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांना प्रत्येक वर्षी १५,००० रुपये, गॅस सिलिंडरसाठी अनुदान, भूमिहीन मजुरांना १० हजार रुपये, धान व तेंदू पत्ता खरेदी करताना अधिक पैसे, जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू करणार आणि इतर काही योजनांबाबत आश्वासने दिली आहेत. निवडणूक जशी येते, तसे राजकीय पक्ष आपली पोतडी उघडतात आणि आश्वासनांची खैरात करतात. छत्तीसगडसारख्या छोट्या राज्यात जिथे अर्थसंकल्पाचा आकारच लहान आहे; मग हजारो कोटींची आश्वासने देणे योग्य ठरते का?
भारतीय सुरक्षा दलाची जम्मू काश्मिरमध्ये मोठी कारवाई, ५ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबत शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) काश्मीर पोलिसांनी माहिती दिली. त्यानुसार ही कारवाई शेवटच्या टप्प्यात असून चकमक सुरू असलेल्या संपूर्ण भागाची तपासणी करण्यात आली आहे.काश्मीर विभागीय पोलिसांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “कारवाईच्या दुसऱ्या दिवशी कुलगाम पोलिसांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही कारवाई आता शेवटच्या टप्प्यात आहे. या संपूर्ण भागात शोधमोहीम राबवण्यात आली आहे.”
आगामी दोन वर्षात ६ ते ७.१ टक्के दराने विकास शक्य
भारतीय अर्थव्यवस्थेची आगेकूच कायम राहणार असून, आगामी २०२४ ते २०२६ आर्थिक वर्षांदरम्यान विकासदर वार्षिक ६ ते ७.१ टक्के राहील, असा अंदाज जागतिक पतमानांकन संस्था ‘एस ॲण्ड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने गुरुवारी वर्तविला.भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास पथ भक्कम आहे. देशांतर्गत आघाडीवर सरकारने वाढवलेला भांडवली खर्च, भारतीय कंपन्यांची सुधारलेली मिळकत कामगिरी आणि बँकांची सुदृढ ताळेबंद स्थिती यांसारख्या सकारात्मक घडामोडींमुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग चालू आर्थिक वर्षासह २०२४-२५ आणि २०२५-२६ मध्ये ७.१ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा ‘एस ॲण्ड पी’चा अंदाज आहे. बँकांच्या सुधारित जोखीम-व्यवस्थापनामुळे ३१ मार्च २०२५ पर्यंत बँकिंग क्षेत्राची बुडीत कर्जे ३ ते ३.५ टक्क्यांपर्यंत खाली येतील, असा कयासही तिच्या ’ग्लोबल बँक्स कंट्री-बाय-कंट्री आऊटलूक २०२४’ या अहवालाने व्यक्त केला आहे. भारतातील व्याजदर भौतिकदृष्ट्या वाढण्याची शक्यता नाही आणि यामुळे बँकिंग उद्योगासाठी जोखीम मर्यादित राहील, असेही अहवालाने नमूद केले आहे.
इस्रायलचे दक्षिण गाझामध्ये कारवाईचे संकेत- पॅलेस्टिनींना स्थलांतर करण्याचे आदेश
इस्रायली सैन्याने दक्षिण गाझामध्ये पत्रके टाकून पॅलेस्टिनींना तो भाग सोडून जाण्यास सांगितले असल्याची माहिती तेथील रहिवाशांनी गुरुवारी दिली. यामुळे इस्रायल आता दक्षिण गाझामध्ये लष्करी कारवाईचा विस्तार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, इस्रायलच्या फौजांनी उत्तर गाझामधील अल-शिफा या सर्वात मोठय़ा रुग्णालयात शोध मोहीम गुरुवारीदेखील सुरू ठेवली. या रुग्णालयात काही बंदुका सापडल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला. मात्र, रुग्णालयाच्या खाली हमासचा तळ असल्याच्या दाव्याच्या पुष्टय़र्थ त्यांनी कोणतेही पुरावे अद्याप दिलेले नाहीत. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
अहमदाबादच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा विजयाचा विक्रम भारतापेक्षा आहे चांगला
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. अहमदाबादच्या या मैदानावर दोन्ही संघ यापूर्वी अनेक सामने खेळले आहेत. टीम इंडियाचा येथे विक्रम चांगला राहिला आहे ,पण ऑस्ट्रेलियन संघाचा येथे भारतापेक्षा चांगला विक्रम राहिला आहे.भारतीय संघाने १९८४ ते २०२३ या कालावधीत अहमदाबादच्या या मैदानावर एकूण १९ सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने ११ सामने जिंकले आणि ८ सामने गमावले. म्हणजे विजयाची टक्केवारी ५७.८९ होती. घरच्या मैदानाप्रमाणे येथे भारतीय संघाची कामगिरी सरासरी राहिली, असे म्हणता येईल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने या मैदानावर आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी ५ सामने जुन्या मोटेरा स्टेडियमवर खेळले गेले आहेत. त्यापैकी ४ सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. म्हणजेच कांगारूंची विजयाची टक्केवारी ६६.६६ इतकी आहे, जी टीम इंडियापेक्षा सरस आहे.
केवळ २६ टक्के भारतीय कंपन्या AI चा लाभ घेण्यासाठी तयार; सिस्को अभ्यासातून उघड
भारतातील केवळ २६ टक्के कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित तंत्रज्ञान वापरण्यास तयार असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. सिस्कोच्या ‘एआय रेडिनेस इंडेक्स’नुसार, भारतीय कंपन्या सध्याच्या वेळेच्या विरोधात भूमिका घेत आहेत. कारण सर्वेक्षण केलेल्यांपैकी ७५ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे AI धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जास्तीत जास्त एक वर्षाचा अवधी आहे, अन्यथा त्याचा त्यांच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.संशोधनात असे आढळून आले की, AI वरील अवलंबित्व अनेक दशकांपासून हळूहळू प्रगती करीत आहे, केवळ जनरेटिव्ह AI मधील प्रगती पाहण्यासाठी सार्वजनिक उपलब्धतेसह तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी आव्हाने, बदल आणि नवीन शक्यतांकडे अधिक लक्ष वेधले गेले आहे.
पदवीधरांसाठी खुशखबर! SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजारांहून अधिक जागांसाठी भरती सुरु
बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदांच्या तब्बल ८७७३ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहेत.अर्ज सुरू होण्याची तारीख – १७ नोव्हेंबर २०२३. अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ डिसेंबर २०२३. अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक – https://bank.sbi/web/careers/current-openings
SD Social Media
9850603590