आज दि.१६ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

संत गोरोबाकाकांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

पंढरपूरच्या कार्तिकी सोहळ्यास जाणारी मराठवाड्यातील एकमेव पालखी असा लौकिक असलेल्या धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्रीसंत गोरोबाकाकांची दिंडी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. भाऊबीजेच्या दिवशी तेर नागरीतून निघालेल्या काकांच्या पालखीचे गुरुवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात धाराशिव शहरात पारंपरिक आगमन झाले.पंढरपूरच्या कार्तिकी सोहळ्यास जाणारी मराठवाड्यातील एकमेव पालखी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्रीसंत गोरोबाकाकांची आहे. या पालखीचे तेर येथून बुधवारी प्रस्थान झाले. गुरुवारी धाराशिव शहरात पारंपरिक उत्साहात पालखीचे आगमन झाले. येथील मुक्कामानंतर उद्या शुक्रवारी पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

अमित शाहांविरोधात उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र, शिंदे गटाकडून बचाव

मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचे (राम मंदिर, अयोध्या) मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजपा सरकार करेल, असं आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (१३ नोव्हेंबर) दिलं होतं. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंगबली की जय’ म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ असं जाहीर केलं आहे. अमित शाहांनी फक्त मध्य प्रदेशपुरती ही घोषणा करू नये. देशातील कानाकोपऱ्यात रामभक्त आहेत. त्या भक्तांना सोयीनुसार मोफत अयोध्यावारी घडवावी.”

पुढील तीन दिवस कुस्तीप्रेमींसाठी मेजवानी, धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरीचा थरार

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार धाराशिव शहरात रंगणार आहे. येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलात जंगी कुस्त्यांचा फड पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी राज्यभरातून ९५० मल्ल व ५५० पंच दाखल झाले आहेत. माती आणि गादीवरील कुस्ती स्पर्धेत नामवंत मल्लांचे शड्डू संकुलात घुमणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती तर अखेरच्या दिवशी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण आणि स्पर्धेचा समारोप होणार असल्याची माहिती आयोजक सुधीर पाटील यांनी दिली.

“मनोज जरांगेंच्या मागून कोणीतरी…” मराठा-ओबीसी संघर्षावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. परंतु, दोन महिन्यात आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू, असं आश्वासन देत राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घ्यायला लावलं. त्यानंतर राज्यातल्या कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, त्यास राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राज्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागलं आहे. आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेते (राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री) छगन भुजबळ यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. भुजबळ यांच्यासह कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी जालन्यात ओबीसी समाजाचा महामेळावा आयोजित करून मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिलं आहे. राज्यातल्या अनेक नेत्यांमुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू झाला आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

असुरक्षित आदिवासी समूहाच्या ७५ जमातींसाठी २४ हजार कोटींची तरतूद; निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “विशेषतः असुरक्षित आदिवासी समूह” या आदिवासी जमातींच्या गटाच्या विकासासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेले अभियान अखेर मार्गी लावले आहे. क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी झारखंड येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत जनजातीय गौरव दिवस (आदिवासी गौरव दिन) साजरा करण्यात आला. सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचीही चाहूल लागलेली असताना आदिवासी समाजातील क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत पंतप्रधान मोदी यांनी विशेषतः असुरक्षित आदिवासी समूहाच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठीचे अभियान जाहीर केले.

उत्तराखंड : पाचव्या दिवशीही कामगार बोगद्यात अडकलेलेच, बचावकार्यासाठी नॉर्वे अन् थायलंडची मदत

उत्तराखंडमधील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यारा बोगद्यात ४० कामगारांच्या बचावासाठी मोठ्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ढिगारा खोदकाम करण्यासाठी नवे यंत्रे बसवण्यात आली आहे. तर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष ठेवण्यात येत आहे.बोगदा असलेल्या डोंगराची स्थिती नाजूक आहे. त्यापार्श्वभूमीवर नॉर्वे आणि थायलंडमधील तज्ञांचे मार्गदर्शन उत्तराखंड सरकारकडून घेतले जात आहे. बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह बोगद्याला भेट देणार आहेत.

चांद्रयान ३ बाबत इस्रोकडून मोठी अपडेट, रॉकेटचा ‘हा’ महत्त्वाचा भाग पृथ्वीच्या कक्षेत परतला!

चांद्रयान ३ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या LVM3 M4 प्रक्षेपण वाहनाचा ‘क्रायोजेनिक अप्पर स्टेज बुधवारी अनियंत्रिपणे पृथ्वीच्या कक्षेत परतला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) याबाबत माहिती दिली. उत्तर प्रशांत महासागरावर संभाव्य प्रभाव बिंदूचा अंदाज लावला गेला आहे. म्हणजेच ही रॉकेट बॉडी प्रशांत महासागरावर उतरेल. परंतु, हे रॉकेट भारतावरून गेलेले नाही, असं इस्रोने निवेदनात म्हटलं आहे.इस्रोने सांगितले की ही रॉकेट बॉडी LVM-3 M4 प्रक्षेपण वाहनाचा भाग होती. बुधवारी, आंतरराष्ट्रीय वेळेनुसार दुपारी २.२४२ च्या सुमारास ते पृथ्वीच्या कक्षेत परतले. प्रक्षेपणानंतर १२४ दिवसांच्या आत रॉकेट बॉडीने पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा प्रवेश केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोहम्मद शमीसाठी खास पोस्ट

मुंबईतल्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या जुगलबंदीत भारतीय संघाने न्यूझीलंडचं आव्हान मोडून काढत ७० धावांनी विजय मिळवला आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली. या लढतीत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सात विकेट्स पटकावत भारताला विजय मिळवून दिला. रनमशीन विराट कोहलीचं विक्रमी ५०वं शतक, श्रेयस अय्यरचं सलग दुसरं शतक यांच्या बळावर भारतीय संघाने ३९७ धावांचा डोंगर उभारला. डॅरेल मिचेलच्या शतकाच्या बळावर न्यूझीलंडने दमदार प्रत्युत्तर दिलं पण दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट्स पडत गेल्याने न्यूझीलंडचा प्रतिकार अपुराच ठरला. सेमी फायनलची दुसरी लढत आज कोलकाता येथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. त्यांच्यातील विजेत्याशी भारताचा रविवारी मुकाबला होणार आहे. दरम्यान, वानखेडेतील सामन्यावरून खुद्द नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत शमीचं कौतुक केलं आहे.

जनतेत काँग्रेसबद्दल संताप; पंतप्रधानांची टीका

काँग्रेसची घराणेशाही तसेच नकारात्मक राजकारणामुळे जनतेत संताप असून, भाजपवर अतूट विश्वास असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. मध्य प्रदेशात बुधवारी प्रचार संपला असून, पंतप्रधानांनी एका संदेशाद्वारे भाजपला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.