इस्रायलमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले बेन्यामिन नेतान्याहू पुन्हा एकदा पंतप्रधानाच्या खुर्चीत बसण्यास सिद्ध झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील उजव्या विचारांच्या आघाडीला ‘क्नेसेट’ (इस्रायलचे कायदेमंडळ) १२०पैकी ६४ जागा मिळाल्या आहेत.
इस्रायलमध्ये चार वर्षांत पाचव्यांदा झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून क्नेसेटचे चित्र स्पष्ट झाले. नेतान्याहू यांच्या लिकूड पार्टीला सर्वाधिक ३२ जागा मिळाल्या. मावळते पंतप्रधान याईर लपिड यांच्या येश आतिद पक्षाला २४ जागांपर्यंतच मजल मारता आली. मात्र सर्वात धक्कादायक निकाल हा नेत्यानाहू यांचा मित्रपक्ष असलेल्या रिलिजियस झिओनिझम या पक्षाचा लागला. अतिउजवा आणि कडवा धार्मिक अशी ओळख असलेला हा पक्ष १४ जागांसह क्नेसेटमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला. अरब अल्पसंख्याकांच्या हदाश-ताल आणि युनायटेड अरब यांना प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. बालाद पक्षाला ३.२५ टक्के मतांचा टप्पा ओलांडता आला नाही. एकेकाळी सत्तेत असलेल्या लेबर पार्टीने जेमतेम मते मिळवत चार जागा जिंकल्या.
एक वर्तुळ पूर्ण
२०१९ साली नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर वेगवेगळय़ा विचारांचे पक्ष एकत्र आले आणि त्यांची सत्ता गेली. केवळ नेत्यानाहूंना सत्तेतून बाहेर करणे, एवढाच या आघाडीचा उद्देश होता. त्यानंतर नेतान्याहूंनी राजकीय संन्यास घेतला. त्यानंतर चार वर्षे देशात राजकीय अस्थैर्य होते. आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे निर्विवाद सत्ता आल्यामुळे एक वर्तूळ पूर्ण झाले असून देशाला स्थिर सरकार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.