तब्बल 9 वर्षांनंतर तापमानाने मोडला रेकॉर्ड, विदर्भासह राज्यात थंडीचा कहर

मागील तीन चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट होत असल्याने गोंदिया जिल्हा गारठल्याचे चित्र आहे. दरम्यान काल जिल्ह्यात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या मोसमातील सर्वात कमी तापमान असून मागील 9 वर्षांतील तापमानाचा रेकॉर्ड मोडला आहे. पारा 7 अंश सेल्सिअसवर आल्याने हुडहुडी कायम आहे. दरम्यान विदर्भात थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने माहिती दिली आहे.

हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवाताची स्थिती तीव्र झाली आहे. परिणामी, उत्तर भारतातील सर्वच राज्यांत थंडीचा कडाका आणि दाट धुके वाढले आहे. मात्र, या भागाकडून राज्यांकडे येणार्‍या थंड वार्‍यांमध्ये बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याची तीव्रता तामिळनाडूपर्यंत आहे. त्यामुळेच विदर्भात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. अजून दोन दिवस या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे; तर उर्वरित भागांत ढगाळ वातावरण राहिले आहे.

पहिल्या पश्चिमी चक्रवाताची तीव्रता कमी होत नाही तोच दुसरा पश्चिमी चक्रवात तयार होत आहे. याशिवाय हवेच्या कमी दाब क्षेत्राचे थंडीवर आक्रमण होते. त्यामुळे किमान तापमानात वाढ होत आहे. महाराष्ट्रातही सध्या किमान तापमानात सरासरीपेक्षा 2-4 डिग्रीने वाढ होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे.

शिवाय, ढगाळ वातावरण जाणवत नसले, तरी अधिक उंचीपर्यंत ढगाळसद़ृश धुक्याचे मळभ आच्छादित असते. त्यामुळे रात्रीतून जमिनीतूनही उत्सर्जित होणारी दीर्घलहरी उष्णता-ऊर्जा पूर्णपणे उत्सर्जित होत नसल्यामुळे किमान तापमानात अपेक्षित घसरण होत नाही. दिवसाही अशा वातावरणामुळे लघुलहरी उष्णता-ऊर्जा जमीन तापवत नाही, त्यामुळे हवेचा थरही शुष्क केला जात नाही आणि त्यामुळे थंडी जाणवत नाही.

शनिवारी (ता. 07) राज्यात अनेक ठिकाणी सकाळी धुके आणि दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. धुके आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. तर पूर्व विदर्भात गारठा वाढला आहे. शनिवारी (ता.07) गोंदिया येथे राज्यातील नीचांकी 7, तर नागपूर येथे 9.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान 11 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. राज्याच्या कमाल तापमानातही वाढ झाल्याचे दिसून आले.

दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 29.9 (16.3), जळगाव 26.2 (14), धुळे 26.5 (11.5), कोल्हापूर 28.5 (18.9), महाबळेश्वर 24.6 ( 14.5), नाशिक 26.1 (15.4), निफाड 27.6 (13.5), सांगली 29.5 (20), सातारा 29.1 (18.6), सोलापूर 31.2 (18.5), रत्नागिरी 34 (21), औरंगाबाद 26 (12.4), नांदेड 28.8 (17), परभणी 27.2 (15.4), अकोला 27.5(16.2), अमरावती 27.8 (13.1), बुलडाणा 25.6 (16), ब्रह्मपुरी 27.9 (11.4), चंद्रपूर 27.2 (14), गडचिरोली 26 (12), गोंदिया 26.8 (7), नागपूर 25.8 (9.9), वर्धा 26 (11.8), यवतमाळ 26 (13) तापमानाची नोंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.