जन्म – ६ जून १९२९
सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज रघुनाथ दत्त होते. सिनेसृष्टीत सुनील दत्त यांनी सिनेमाची निर्मिती, अभिनय, दिग्दर्शकसारख्या अनेक भूमिका साकारल्या. जवळपास चार दशकांपर्यंत त्यांनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यांचे पात्र वास्तविक जीवनाच्या जवळचे असायचे. त्यांचे व्यक्तीमत्वसुध्दा तशाच पात्रांनी प्रभावित राहिले. फाळणीच्या दरम्यान त्यांचे कुटुंबिय भारतात आले होते. त्यांनी मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि सोबतच नोकरीसुध्दा केली. सुनील यांनी रेडिओ सीलोनमध्ये हिंदी उद्घोषकच्या रुपात काम केले. त्यांनी ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’पासून फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. ‘मदर इंडिया’ सिनेमाने त्यांच्या करिअरला एक नवीन वळण दिले आहे. सुनील दत्त भारतीय सिनेसृष्टीत अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांच्या सिनेमाची पन्नास ते साठ दशकांमध्ये छाप प्रेक्षकांवर राहिलेली आहे. ‘मदर इंडिया’च्या यशानंतर ‘साधना’, ‘सुजाता’, ‘मुझे जीने दो’, ‘खानदान’, ‘पडोसन’सारख्या यशस्वी सिनेमांनी भारतीय प्रेक्षकांमध्ये एक यशस्वी अभिनेता म्हणून त्यांना ओळख निर्माण केली. सुनील दत्त आणि नर्गिस यांची प्रेमकथा एखाद्या फिल्मी लव्ह-स्टोरीप्रमाणे आहे. ‘मदर इंडिया’ सिनेमात सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. एक दिवशी शुटिंगदरम्यान त्यांच्या सेटवर आग लागली. सेटवर लागलेल्या आगीत नर्गिस अडकल्या. ते पाहून सुनील दत्त यांनी आपला जीव धोक्यात टाकून आगीत उडी मारली. या घटनेने सुनील आणि नर्गिस यांना जवळ आणले. त्यानंतर एकमेकांना भेटण्याचे सत्र सुरू झाले आणि दोघे लग्नगाठीत अडकले. बी. आर. चोप्रासोबत ‘गुमराह’, ‘वक्त’, ‘हमराज’ सारख्या सिनेमांमध्ये साकारलेल्या भूमिका अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या आयुष्यातील ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमात पहिल्यांदा त्यांनी मुलगा संजय दत्तसह काम केले होते. त्यापूर्वी ‘क्षत्रिय’ आणि ‘रॉकी’ सिनेमातसुध्दा दोघांनी एकत्र काम केले परंतु सिनेमातील एकाही दृश्यात ते एकत्र दिसले नाहीत. सुनील दत्त यांचे २५ मे २००५ रोजी निधन झाले.