उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी यांच्या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयला करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. सचिन वाझे यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सचिन वाझे यांना विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं असताना एनआय कोठडीत वाढ करण्यात आली. कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत कोठडी वाढवली आहे. चौकशी करण्यासाठी वेळेचं नियोजन करा असं कोर्टाने सीबीआयला सांगितलं आहे.
अंबानी यांच्या घराजवळ एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूवातील सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आलं. स्फोटकं प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. यानंतर प्रकरणाला नवीन वळण मिळाले होते. स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असताना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे सोपवला होता.
दरम्यान, दोन्ही यंत्रणांकडून तपास सुरू असताना एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली. १३ तास चाललेल्या चौकशीनंतर एनआयएच्या पथकाने सचिन वाझे यांना अटक केली. अटक करण्यात आल्यानंतर वाझेंना एनआयए न्यायालयसमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने वाझे यांची २५ मार्चपर्यंत आणि नंतर ७ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत रवानगी केली होती.