सर्वसामान्य लोक किंवा कोणतीही व्यक्ती न्याय मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढते. त्यामुळे, कोर्टाची एक वेगळीच प्रतिमा प्रत्येकाच्या मनात असते. मात्र, आता पुणे जिल्हा न्यायालयाच्या एका अजब आदेशाची सध्या चर्चा रंगली आहे. हा आदेश महिला वकिलांसाठी असून याबाबतची नोटीस वाचून तुम्हीही थक्क व्हाल. या नोटीसचा फोटो समोर आला आहे.
या नोटीसमध्ये लिहिण्यात आलं आहे, की ‘हे वारंवार निदर्शनास आलं आहे की महिला वकील अनेकदा कोर्टामध्येच आपले केस व्यवस्थित करत असतात. हे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा आणणारे किंवा विचलित करणारं आहे. त्यामुळे महिला वकिलांना अशी कृत्य न करण्याचा सल्ला याद्वारे दिला जात आहे’, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. पुणे जिल्हा न्यायालयाच्या या नोटीसचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
पुण्यात फटाके उडवण्यावर बंधनं –
दरम्यान दिवाळी उत्सवाला सुरुवात झालेली आहे. अशात 125 पेक्षा जास्त डेसिबल आवाजाचे फटाके उडविण्यास पिंपरी चिंचवड शहरामध्ये बंदी घालण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते 23 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यावर रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण बंदी घातली आहे.