‘अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? शिवसेनेला भाजपवर हल्लाबोल

 ‘सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले, हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय? ‘अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? सामान्य जनता आणि अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा आज अंधारात चाचपडत आहे. अर्थात राज्यातील मिंधे सरकार दिवाळी संपण्यापूर्वी जनतेला किमान दिलासा देईल, अशी अपेक्षा करणे व्यर्थच आहे’ असं म्हणत शिवसेनेनं दिवाळीच्या दिवशी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे.राज्यावर अस्मानी संकट आणि महागाईच्या मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

राज्यातील महानगरे व मोठय़ा शहरांत दिवाळीचा धुमधडाका जोरात दिसत असला तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ग्रामीण जनता मात्र ऐन दिवाळीत चिंताक्रांत होऊन बसलेली दिसत आहे. लोकांना दैनंदिन जीवनात जे प्रश्न भेडसावताहेत, त्यांचा जनतेला विसर पडला या भ्रमात सरकारने राहू नये. केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यात सत्तेवर असलेले मिंधे सरकार आश्वासनांची आतषबाजी तर जोरात करीत आहे, पण जनतेच्या जीवनातील अंधार कायमच आहे. ‘अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? अर्थव्यवस्थेचे दिवाळे का वाजले? डॉलरच्या धुमधडाक्यात रुपयाचा रोज ‘आपटी बार’ का होतोय? महागाई कमी का होत नाही? गॅस व पेट्रोल-डिझेलचे दर दुपटीने का वाढले? असे सवालच शिवसेनेनं केंद्र आणि शिंदे सरकारला विचारले आहे.

बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस का वाढतेय असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मनात धुमसत आहेत. या फटाक्यांची वात जेव्हा पेटेल तेव्हा सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही सेनेनं शिंदे सरकारला दिला.राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर जे ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे, त्या चिंताक्रांत शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर कसा करता येईल याचा विचार सरकारने करायला हवा. यंदाच्या पावसाळ्याने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना पुरते उद्ध्वस्त केले. लाखो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. मूग, उडदापासून आता हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कापसाचे पीकही ढगफुटीसारख्या पावसाने शेतातच सडत पडले. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर अंधार आहे. सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले, हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय? असा सवालही सेनेनं केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.