परीक्षा न घेताच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थी पुढील वर्गात

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून शिक्षण क्षेत्रामध्ये विचित्र वातावरण निर्माण झालेले आहे. कारण शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. अशा अवस्थेमध्ये शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्यासाठी आता शिक्षण विभागाने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा कहर वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे. नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा यंदा ऑनलाइनच झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत. अकरावीचे वर्गच नोव्हेंबरनंतर सुरू झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा पेच शिक्षण विभागासमोर होता. तर दुसरीकडे निर्बंध, कोरोनाचे वाढते रुग्ण यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, रद्द करण्यात याव्यात अशा मागण्या पालक करत होते. मात्र, ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभाग ठाम होतं.

गेल्या वर्षी परीक्षेच्या सुमारास सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव यंदाही परीक्षांच्या तोंडावर बळावला. त्यामुळे पुन्हा परीक्षांबाबत शिक्षण विभागासमोर पेच निर्माण झाला. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय विभागाने नुकताच जाहीर केला. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या वर्गांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे सद्य:स्थितीत शक्य नाही. विभागाने यापूर्वी विविध घटकांची मते जाणून घेतली असता या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता.

गेल्या वर्षीही नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्या वेळी काही शाळांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुत्तीर्ण केले. जे विद्यार्थी अंतर्गत परीक्षा देऊ शकले नव्हते त्यांनाही या निर्णयाचा फटका बसला. त्याचप्रमाणे शुल्क भरले नाही म्हणून शाळा अनुत्तीर्ण करत असल्याच्या तक्रारीही विभागाकडे आल्या होत्या. अकरावीची प्रवेश प्रक्रिया जानेवारीपर्यंत सुरू होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अवघ्या दोन-तीन महिन्यांत परीक्षेला बसवायचे का, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला होता. ऑनलाइन वर्गात अद्याप पन्नास ते साठ टक्केच अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करावा आणि त्यानंतर शाळा, महाविद्यालयांना मूल्यांकन करण्याची मुभा द्यावी, असे मत एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांनी व्यक्त केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.