डी गँगच्या तीन जणांना पकडले,
नवाब मलिकांशी संबंध असल्याची चर्चा
एनआयएने मुंबईत डी कंपनीची कोंडी करायला सुरूवात केली आहे. एनआयएने सकाळपासूनच डी कंपनीशी संबंधितांवर छापे मारले. विशेष म्हणजे छापे मारलेल्यांपैकी बहुतांश जण हे मंत्री नवाब मलिकांशीही संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. या छापेमारीतून नवाब मलिक यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातं आहे. एनआयएने छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट याला ताब्यात घेतलं आहे. तर माहिममधून सुहेल खंडवानी आणि कय्यूम नावाच्या व्यावसायिकाला ताब्यात घेतलंय. सुहेल खंडवानीचे नवाब मलिकांचा मुलगा फराझ मलिकशी संबंध असल्याचा संशय आहे.
देशद्रोह कायद्यातील तरतुदींचा
पुनर्विचार केला जाणार
केंद्र सरकारने सोमवारी देशद्रोह कायद्यासंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशद्रोह कायद्यातील तरतुदींचा पुनर्विचार आणि चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे केंद्राने म्हटले आहे. जोपर्यंत सरकार चौकशी करत नाही तोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी करू नये, अशी विनंती सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशद्रोहाच्या भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ अ च्या वैधतेची तपासणी आणि पुनर्विचार केला जाईल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात
जुलै मध्ये वाढ होण्याची शक्यता
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा सरकारने मार्चमध्ये केली होती. सरकारने 1 जानेवारीपासून महागाई भत्ता वाढवण्यात येणार असल्याचे म्हटले होते. एप्रिल महिन्याच्या पगारासह तीन महिन्यांची थकबाकी देण्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले होते. आता जुलैमध्ये पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये आलेल्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक वरून हे स्पष्ट झाले आहे की जुलै-ऑगस्टमध्ये महागाई भत्ता 4% दराने वाढू शकतो.
चक्रीवादळामुळे मान्सून लवकर
येण्याची शक्यता वाढली
बंगालच्या उपसागरातल्या असनी चक्रीवादळाने मान्सूनची वाट सोपी केली आहे. असनी चक्रीवादळ शमल्यावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल. त्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने होईल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. अंदमानात मान्सून 17 मे पर्यंत तर केरळात 28 मेपर्यंत पोहोचेल असं सांगण्यात आलं आहे. आज या चक्रीवादळाचं महाचक्रीवादळात रूपांतर होत आहे. त्यामुळे कोकणात बुधवारी आणि गुरूवारी तर मध्य महाराष्ट्रात गुरूवार आणि शुक्रवारी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नवनीत राणा यांचा जामीन
रद्द होण्याची शक्यता
खासदार नवनीत राणा यांना मिळालेला जामीन का रद्द करु नये, अशी विचारणा सत्र न्यायालयानं केली आहे. राणा दाम्पत्याला कोर्टानं नोटीस बजावलीय. त्यावर उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेत. राणा दाम्पत्यानं मीडियाशी बोलू नये, याच अटीशर्तीवर राणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तरीही नवनीत राणा यांनी रुग्णालयातून बाहेर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. त्यानंतर जामीन रद्द करण्याचा अर्ज सरकारतर्फे कोर्टात दाखल करण्यात आला आहे.
अतिक्रमणविरोधी मोहिमेमुळे
शाहीनबाग परिसरात तणाव
शाहीन बाग परिसरातील एमसीडीच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने सीपीआय(एम) आणि इतर याचिकाकर्त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं. तसेच ‘अतिक्रमण मोहिमेमुळे ज्यांचं नुकसान झालं त्यांना न्यायालयात येऊ द्या’ असंही कोर्टानं यावेळी म्हटलं आहे. खरंतर, दक्षिण दिल्ली महानगरपालिकेनं सोमवारी सकाळी शाहीन बाग येथील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली होती.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर
गॅस टँकर उलटला, तीन जणांचा मृत्यू
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याची घटना घडली आहे. यामुळे घडलेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात होता. दरम्यान महामार्गावरच टँकर उलटल्याने दोन्ही बाजुची वाहतुक थांबविण्यात आली आहे. खोपोली एक्झिट जवळ उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे टँकर पुणे लेन वर येऊन उलटला. यावेळी टँकरला ती गाड्या धडकल्याने भीषण अपघात घडला ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.
दुचाकीला वाट न दिल्याच्या
कारणातून पुण्यात एकाचा खून
पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील लवासा रस्त्यावर एक थरारक घटना घडली आहे. दुचाकीला वाट न दिल्याच्या कारणातून तीन जणांनी दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला बेदम मारहाण केली आहे. या बेदम मारहाणीत दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. सुभाष विठ्ठल वाघमारे (वय ३८, रा. तुंगी, ता. मावळ, जि. पुणे) असं बेदम मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
…तर CSK प्ले-ऑफमध्ये पोहोचणार, धोनीचा करिश्मा पुन्हा दिसणार!
आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आपला चौथा विजय मिळवला आहे. रविवारी डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सचा 91 रनने पराभव केला, याचसोबत धोनीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये 8 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. दिल्लीविरुद्धच्या या विजयासोबत सीएसकेचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न अजून कायम आहे, पण हा प्रवास अत्यंत कठीण असणार आहे.
सीएसकेच्या लीग स्टेजमधल्या आणखी 3 मॅच शिल्लक आहेत. जर या तिन्ही सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला, तर ते 7 विजयांसह 14 पॉईंट्सवर जातील, पण त्यांना इतर टीमच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं लागणार आहे. दिल्लीविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर सीएसकेचा नेट रनरेटही चांगला झाला आहे.
SD social media
9850 60 3590