रविवार विशेष ….
अर्धांगिनीला पत्नी, भार्या, दारा, सहधर्मचारिणी, कांता, जाया,आई-जन्मदा,ललना हे शब्द खूप सौम्य वाटतात, पण बायको हा शब्द निश्चितच भारदस्त आणि जबरदस्त वाटतो. आपल्या संसाररुपी नाटकातील सर्वात शक्तीशाली आणि महत्वाचं पात्र म्हणजे अर्धांगिनी….अर्थात बायको ! त्यामुळेच संसारातील सारीचं पात्र नावारुपाला येतात. तिचं असणचं अस्तित्व असतं नव-यासाठी. बायको पेक्षा जास्त कुणीच नव-याला जपू शकत नाही, आणि हे सांगायला बायकोला कुठलीही सिद्धता करण्याची गरज नाही.
बायको या शब्दाची जर फोड केली तर ‘बा’ म्हणजे तुमच्या बाजूने भक्कमपणे उभी राहणारी, ‘य’ म्हणजे येईल त्या परिस्थितीला तोंड देणारी, सामोरे जाणारी आणि ‘को’ म्हणजे कोणासाठीही नाही तर फक्त आणि फक्त कुटुंबासाठी जगणारी. सुखदुःखात साथ देणारी म्हणून तिला ‘बायको’ असं म्हटलं जातं. बायको म्हणजे संसारासाठी सतत तेवणारी ज्योत असते. मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं पण बायकोला मैत्रिण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल. शेवटी नव-यापेक्षा अधिक जवळचा तिच्यासाठी कोण असेल!
बाहेर मित्र आणि मैत्रिणी शोधण्यापेक्षा बायकोमध्येच मैत्रिण सापडली तर तिला आणखी काय हवं ? प्रत्येक नव-याला वाटतं की बायकोसाठी खूप काही करावं लागतं, पण सत्य परिस्थिती अशी असते की तिला लागते नव-याची साथ ! हातात भक्कम हात !! समजून घेणारं हृदय ! इतके प्रेम की तिला माहेरच्या लोकांचीही आठवण येवू नये ! एक जवळचा मित्र आणि जो अहंकार बाजूला ठेवून तिच्याशी चांगला वागेल, ज्याच्याजवळ इतकं मन मोकळ करता येईल की मैत्रिणीचीही गरज असणार नाही,जिच्या डोळ्यात आपल्यामुळे कधीच अश्रू यायला नको.
एक स्री म्हणून मान आणि तिच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भक्कम साथ !बस,इतकं मिळाल की ती झोपडीलाही स्वर्ग बनवेल,आणि भाकरीचा तुकडाही तिला पंचपक्वान्न वाटेल.
एका स्त्रीला नव-याकडून, हवा असलेला सुंदर दागिना म्हणजे ?…….त्याने दिलेलं ‘ स्वातंत्र्य ‘.मनाच स्वातंत्र्य , विचारांचं स्वातंत्र्य ,आणि ते विचार जगण्याचं स्वातंत्र्य. हाच प्रत्येक स्त्रीला लाख मोलाचा दागिना असतो. ज्या स्त्रीकडे हा दागिना असेल तिला सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही सोन्याचा दागिन्यांची गरज कधीच भासत नाही.
हसतीखेळती बायको आपल्या घरात असणं हे केवढं मोठं वैभव आहे , हे ब-याच लोकांना कळतच नाही. ब-याच जणांना ते उशिरा कळतं आणि वळतं. काही जणांना कळतं पण तेव्हा फार उशिर झालेला असतो.
घरातील स्त्री हसत खेळत असेल ,खुष असेल तर घराच्या भिंती खुष असतात आणि त्यामुळे घराला घरपण येतं आणि घरातील वातावरण आनंदी राहतं. ” आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे ” असेच वातावरण घरामध्ये कायम असते. हे इतकं सोपं असूनही बहूतेक घरांमध्ये आनंदी आनंद का नसतो ? ताण तणाव का असतात! याचं ऊत्तर लक्षात आलं असेलचं.
सकाळी उठल्यावर चहा पितांना,पेपर वाचू नका,बातम्या ऐकू नका,मोबाईलवर सतत फेसबुक व्हॉटसप्स बघू नका. चहा पितांनाची वेळ बायको साठी राखीव ठेवा.आपण आपल्या बातम्या थोड्या उशिरा वाचल्या तर कुठेही आकाश पाताळ एक होणार नाही,आपण बातम्या थोड्या उशिरा ऐकल्यातर त्यामुळे आपल्यावर कुठलेही संकट कोसळणार नसते,आणि घडलेल्या घटना बदलणार नसतात. हे आगदी सरळ आहे,वाटल्यास दोन दिवस अनुभाव घेऊन बघा.
एका ठिकाणी लेखक व्यंकटेश कल्याणकर म्हणतात , पत्नी म्हणजे प्रेम, त्याग. परोपकाराचं दुसरं नाव म्हणजे पत्नी. स्वतःच अस्तित्व विसरुन साखर जशी पाण्यात विरघळते, अगदी तशीच सासरी विरघळून, सासर गोड करणारी साखर म्हणजे ” पत्नी ” होय. कौतुक आणि, कृतज्ञतेच्या गावी जाण्याचं ही न पहाता आजन्म यंत्रवत विनामुल्य चोविसतास अविरत सेवा देणारी महात्यागी व्यक्ती म्हणजे पत्नी. पदरी पडलेल्या आणि नंतर बदललेल्या पतीरुपी प्रियकराला जसा आहे, तसा स्विकारुन त्याच्या कुशीतच आपलं अस्तित्व शोधणारी प्रेमळ प्रेयसी म्हणजे पत्नी .
स्वतःच्या जीवातून नवाजीव घडवणारी विश्वनिर्माती म्हणजे पत्नी. उंबराच्या बाहेर पडल्यावर वेदना पिऊन सासरचे गोडवे गाणारी थोर स्त्री म्हणजे पत्नी.
आणखी एका ठिकाणी लेखिका मनीषा बोरुडे म्हणतात की,संसाराचा रथ दोन चाकावर चालतो,त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो .एक चाक डगमगलं तर एका चाकावर रथ हाकणं फार अवघड होतं. बायको शिवाय घराला घरपण नाही, तसचं नव-याशिवाय बायको पूर्ण नाही, तो कळस आहे, घराचा छतं आहे. परिवाराचा चटके तो खातो ,आपण मात्र सावलीत रहातो.नवरा तो नवराच असतो. आयुष्यातील सगळ्या पोकळ्या भरता येतील पण नव-याची पोकळी कधीच भरुन निघू शकणार नाही, म्हणून एकमेकांना मायेची हाक द्या , प्रेमाची साथ द्या ! जीवन क्षणभंगूर आहे. जगण्याचा,जीवनाचा आनंद घ्या!
कवीचं नाव माहित नाही,परंतु कविता आवडली म्हणून देत आहे.
माप ओलांडून ती लक्ष्मी म्हणून आली !
तिचं घर सोडून ती
या घरची झाली !!
माझे घर तिचं म्हणून
सहज तिनं सावरले !
पण माहेरच्या
आठवणींचे किती हुंदके तिने आवरले !!
हे मला कधी कळलेच नाही……..
स्वतःची आवड,स्वतःची स्वप्ने
बाजूला ठेवली !
माझे स्वप्न,माझी आवड,मात्र जपत गेली !!
तिचीही काही स्वप्ने असतील !
तिच्याही काही आवडी असतील !!
हे मी कधी तिला विचारलेच नाही……
नविन रुचकर पदार्थ अनेकदा चाखले !
कौतुकाचे बोल मात्र मी हातचे राखले !!
क्वचितच काही करपले,तर लगेच नाव ठेवले !
पण ते करतांना तिने किती चटके सोसले!!
हे कधी मला जाणवलेच नाही……
मी चार पैसे कमवले,तिने दोन पैसे वाचवले !
माझ्या न कळत भविष्यासाठी साठवले !!
मी घर चालवतो,ती सांभाळते !
चालवण्यापेक्षा सांभाळणे कठीण असते !!
हे मला कधी समजलेच नाही……
अशीच वर्षे सरत गेली !
कोणाला काय हव ? नको ते सार बघत गेली !!
अर्धांगिनी म्हणून आयुष्यभर सोबत ती रहावी !
पण तिच्या ऋणांची परतफेड कशी करावी !!
हे मला कधी जमलेच नाही……..
माहेरी गेल्यावर कायम सासरची ओढ असणारी माहेरची लेक म्हणजे पत्नी. सगळ संपून अनंताच्या प्रवासाला निघतांनाही सासरकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता "माहेरची साडी " नेसून स्वर्गस्थ होणारा देह म्हणजे पत्नी.
शेवटी जाता जाता…
सगळं तुला देऊन पुन्हा !
माझी ओंजळ भरलेली !!
पाहिलं तर तुझी ओंजळ !
माझ्या ओंजळीत धरलेली !!
सुरेश थोरात , धुळे
99608 60759