मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाशी सामना करु शकतात, ही गोष्ट कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमगली असेल. त्यामुळेच तौक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावे, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्यावेळी कोणावरही टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत, याचीही त्यांना खात्री पटली असावी. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर आहे. त्यामुळे मोदी कदाचित तिथला दौरा करत असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले.
देशात अगदी उद्या निवडणूक झाली तरी मोदी सरकार 400 जागा जिंकेल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडला आहे, याचं मला कौतुक वाटतं. त्यामुळे भाजपला 400 काय अगदी 500 जागाही मिळू शकतात. एवढंच काय ते जगभरातील पार्लामेंटसच्या सर्व जागा जिंकू शकतात, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला. सध्या राजकीय भविष्य वर्तवण्यापेक्षा कोरोना काळात लोकांचं भविष्य घडवणे जास्त गरजेचे आहे, असेही राऊत यांनी सांगितले.