उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील राज्यमंत्री विजय कश्यप यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर मेंदाता रुग्णालयात उपचार सुरू होते. तर राजस्थानचे भाजपचे आमदार गौतम लाल मीणा यांचंही कोरोनाने निधन झालं आहे.
विजय कश्यप हे योगी सरकारमध्ये पूर व्यवस्थापन राज्यमंत्री होते. त्यांना 29 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच काल उशिरा त्यांचे निधन झाले. ते मुजफ्फर नगरमधील चरथावल विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कश्यप यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे ते नेते होते. ते नेहमी जनहिताची कामे करायचे, असं मोदी यांनी शोक संदेशात म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कश्यप यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. कश्यप हे लोकप्रिय नेते होते. त्यांनी मंत्री म्हणून अत्यंत चांगलं काम केलं आहे. ते जनतेचे सच्चे सेवक होते, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही कश्यप यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
राजस्थानचे भाजपचे आमदार गौतम लाल मीणा यांचं आज सकाळी कोरोनाने निधन झालं. त्यांच्यावर महाराणा भोपाळ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ते उदयपूर धरियावद येथील आमदार होते. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. मीणा यांच्या निधनावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शोक व्यक्त केला आहे.