उजनी धरणातील पाण्याचा आदेश रद्द करण्यात आलाय. स्वतः राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतलाय. उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवले जात असल्याचा आरोप होत होता. यावरुन इंदापूचे आमदार तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात सोलापुरात अनेक आंदोलनंही झाली. सोलापुरातल्या लोकप्रतिनिधींनीही याला मोठा विरोध केल्यानंतर जयंत पाटील यांनी उजनीच्या पाण्याविषयीचा आदेश रद्द केला. जयंत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळाले आहेत. इंदापूर तालुक्यात नागरिकांनी रास्ता रोको केला. दुसरीकडे पंढरपूरमध्ये इंदापूरला पाणी नेण्याबाबतचा आदेश रद्द झाल्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नामदेव पायरीजवळ चंद्रभागेच्या पाण्याने जलाभिषेक घालण्यात आला.
उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी उचलण्याचा निर्णय जयंत पाटील यांनी रद्द केल्यानंतर इंदापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील शेतकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे पुणे सोलापूर हायवे वर टायर जाळत रस्ता रोको केला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.
इंदापूरला 5 टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय रद्द केल्याने पंढरपूरमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीकडून जलाभिषेक घालण्यात आला.पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरातील संत नामदेव पायरी जवळ श्री विठ्ठलाच्या प्रतीकात्मक मूर्तीला चंद्रभागेच्या पाण्याने जलाभिषेक घालून कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. चंद्रभागा नदीतून कावडीने पाणी आणून घातला जलाभिषेक घालण्यात आला.
सोलापूरच्या उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उजनीतून पाणी उचलून इंदापुरात नेण्यासाठी लाकडी निंबोळी योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्तक्षेपामुळेच हे पाणी वळवण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. त्याला सोलापूरकरांनी विरोध केला.