रत्नागिरीमध्ये लवकच सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय साकारण्यात येणार आहे. राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे हे रुग्णालय होणार असून या रुग्णालयासाठी पाच एकर जागा देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली.
अशोक चव्हाण यांनी या बाबतची माहिती दिली आहे. राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 ला लागून असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागासह आरोग्य, महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या रुग्णालयासाठी गट नं. 866 मधील 5 एकर जागा आरोग्य विभागास हस्तांतरित करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार ही जागा महसूल व वन विभागास प्रत्यार्पित करण्याचा निर्णय चव्हाण यांनी घेतला आहे.
सदरहू निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल पडले आहे. उपचाराच्या आधुनिक सेवासुविधा उपलब्ध असलेले हे रूग्णालय रत्नागिरी जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देणार आहे. शिवाय हे रूग्णालय मुंबई-गोवासारख्या व्यस्त राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने अपघातग्रस्तांनाही वेळीच उपचार उपलब्ध करून देणे शक्य होऊ शकेल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यात झालेले नुकसान विचारात घेवून कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प या नावाने कोकणासाठी हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे 3 हजार 200 कोटी पैकी 2 हजार कोटी रुपये राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून खर्च करण्यास आणि उर्वरित 1200 कोटी रुपये पुढील 4 वर्षात (सन 2022-25) राज्याच्या निधीतून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.