मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही. त्यामुळे मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करूनच मी माझी पुढची भूमिका ठरवेन. माझी भूमिका ही सकारात्मक असेल, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कालच संभाजीराजे यांनी ट्विट करून आपण लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते.
सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे मी तसे ट्विट केले. आता सर्व लोकांशी सविस्तर चर्चा करुन मी माझी भूमिका मांडेन, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. माझी भूमिका ही शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका असेल. त्याच्या राजकीय पक्षांशी कोणताही संबंध नसेल. ती समस्त मराठा समाजाची भूमिका असेल, असेही संभाजीराजे यांनी निक्षून सांगितले.
मराठा आरक्षणाच्या समस्येवर मार्ग निघेल, याविषयी मी सकारात्मक आहे. मार्ग निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही. माझी यापूर्वीची भूमिकाही समंजस होती. सध्याच्या घडीला कोरोनाची साथ रोखणे गरजेचे आहे. आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो. आताच्या घडीला उद्रेक झाला तर त्याचा त्रास सामान्य माणसाला होऊ शकतो, असे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.
अनेक राजकीय पक्ष सध्या त्यांची भूमिका मांडत आहेत. मात्र, ती माझी भूमिका नाही. मी मराठा आरक्षणासंदर्भात बराच अभ्यास केला आहे. 102 वी घटनादुरुस्ती, अॅटर्नी जनरल न्यायालयात काय बोलले किंवा राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी का, यावर मी लवकरच बोलेन. मी आता मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि अभ्यासकांना भेटणार आहे. न्यायमूर्ती गायकवाड यांच्याशीही मी चर्चा करेन, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता राज्यभरात होऊ घातलेल्या आंदोलनांबाबत भाजपने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात भाजपचे (BJP) कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी पत्रक काढून यासंदर्भातील घोषणा केली होती.