सौदी अरेबियाने भारताला मोठा झटका दिला आहे. सौदी अरेबियाने एकिकडे पाकिस्तानमधील नागरिकांवर प्रवेशबंदीचे निर्बंध कमी केले आहेत, मात्र दुसरीकडे भारतासाठी हेच निर्बंध कायम ठेवलेत. त्यामुळे सौदी अरेबियात काम करणाऱ्या भारतीयांच्या अडचणी कायम राहणार आहेत. मागील वर्षी कोरोना संसर्गाचा धोका पाहता सौदी अरेबियाने इतर देशांमधील नागरिकांना येण्यास बंदी घातली होती. मात्र, आता पाकिस्तानसह अनेक देशांवरील हे निर्बंध हटवण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. मात्र, भारतीयांच्या प्रवेशावरील निर्बंध कायम आहेत.
सौदीने भारतावर निर्बंध कायम ठेवण्यामागे भारताताल कोरोना संसर्गाचं कारण दिलंय. भारतच नाही तर भारतासह आणखी काही देशांवरही सौदीने प्रवेश बंदी केलीय. यात लीबिया, सीरिया, लेबनान, यमन, ईरान, तुर्की, आर्मेनिया, सोमालिया, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, अफगाणिस्तान, वेनेझुएला आणि बेलारूसचा समावेश आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. तरीही पाकिस्तानच्या नागरिकांना सौदीत येण्याची परवानगी देण्यात आलीय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सौदी अरेबियाचा दौरा केल्यानंतर पाकिस्तानला प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने 17 मेपासून आपल्या देशाच्या सीमा सुरु होणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे सौदीने परवागनी दिलेल्या देशांच्या नागरिकांना जमीन, हवा आणि समुद्र अशा तिन्ही प्रकारच्या मार्गाने येता येणार आहे. सौदीच्या मंत्रालयानं म्हटलं, “ज्यांनी कोरोना लस घेतलीय आणि ज्या रुग्णांनी 6 महिन्याच्या आत कोरोनावर मात केलीय त्यांना सौदीत प्रवेशास परवानगी असेल. याशिवाय 18 पेक्षा कमी वय असलेल्या आणि कोरोनापासून संरक्षण देणारी विमा योजना असलेल्या नागरिकांनाही प्रवेश देण्यात येणार आहे.”
सौदी अरेबियाने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार आता तेथील सर्व 43 आंतरराष्ट्रीय विमानतळं सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे या विमानतळावरुन जगभरातील 71 ठिकाणी हवाई प्रवास करता येईल. मात्र, ज्या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त आहे त्या देशांना सौदीत अजूनही प्रवेश बंदी आहे, असं सौदीने सांगितलं. सौदीच्या या निर्णयाचा अनेक भारतीयांना फटका बसलाय. सध्या सौदीत 4 लाख 30 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच 7 हजारपेक्षा अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.