व्लादिमीर पुतिन कधीही
विजयी होणार नाही : जो बायडेन
युक्रेन-रशिया युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांत रशियन हल्ल्यांमुळे अनेक युक्रेनियन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी युक्रेन सोडून पलायन केल्याचं वृत्त आहे. दोन्ही देशादरम्यान चर्चा सुरू असून युद्धावर तोडगा निघालेला नाही. अशातच युक्रेनमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन कधीही विजयी होणार नाही, असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केलंय. रशियन हल्ल्यात जवळची लोक गमावलेल्या आणि संघर्षाला बळी पडलेल्या लोकांमध्ये रशियाविरुद्ध संताप वाढतोय. जगभरातही रशियाविरोधात संताप वाढतोय. व्हाईट हाऊसमध्ये पुतीनची खिल्ली उडवत बायडेन म्हणाले की, या युद्धाची रशियाला भयंकर मोठी किंमत मोजावी लागेल. तसेच युक्रेनमध्ये पुतिन यांच्यासाठी कधीच विजय नसेल.”
खनिज तेलाच्या
आयातीवरील बंदी
युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या रशियाला अमेरिकेने मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने मंगळवारी रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयामागील सर्वात मोठे कारण रशियाच्या अर्थव्यवस्थेवर निर्बंध लादण्याचे आहे. कारण रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आहे. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यानंतर रशियाची आर्थिकदृष्ट्या कोंडी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी वेगवेगळे निर्बंध जाहीर केले असून त्यातील एक म्हणजे खनिज तेलाच्या आयातीवरील बंदी आहे.
मलिकांच्या राजीनाम्याचा निर्णय
दाऊदच्या दबावामुळे बदलला
भाजपाच्या नेत्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. पण राष्ट्रवादी पक्ष नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचं शरद पवारांसह अनेक नेत्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत मोर्चा काढला. राज्यात गेल्या २७ महिन्यांत संजय राठोड यांचा राजीनामा पक्षाने दबावात आल्यानंतर घेतला. तर, अनिल देशमुखांच्या बाबतीत हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले, त्यानंतर राजीनामा घेतला. मलिकांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राजीनामा घ्यायचा निर्णय झाला, परंतु थोड्या वेळात हा निर्णय बदलला. हा निर्णय कोणाच्या दबावामुळे बदलला?, तर दाऊदच्या दबावामुळे बदलला,” असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
मलिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी
खंबीरपणे उभी : पवार
शरद पवार यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. “नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा संबंधच नाही. नवाब मलिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी असून मुस्लिम कार्यकर्त्याचं नाव दाऊदशी जोडायचं हे कार्य घृणास्पद आहे,” असं शरद पवार म्हणाले.
मलिक यांच्या विरोधात आंदोलन,
फडणवीस यांच्यासह अनेक नेते ताब्यात
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने आज मुंबईमधील आजाद मैदानामध्ये आयोजित केलेल्या धडक मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फडणवीस यांच्यासहीत भाजपाच्या अन्य नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून केली जात होती. याच मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत मोर्चा काढलाय. या मोर्चाला ३० ते ४० हजार लोक उपस्थित असतील असा दावा भाजपाने केलाय.
करोनाच्या चौथ्या
लाटेची येण्याची शक्यता
देशातील ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञांनी करोनाची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील संभाव्य वाढ यासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. आयसीएमआरच्या सेंटर फॉर अॕडव्हान्स्ड रिसर्च इन व्हायरोलॉजीचे माजी संचालक डॉ. टी. जेकब जॉन्स यांनी करोनाची तिसरी लाट आणि चौथ्या लाटेची येण्याची शक्यता यासंदर्भात महत्त्वपूर्ण निरीक्षण मांडलं आहे. पीटीआयच्या हवाल्याने इंडिया टुडेनं हे वृत्त दिलं आहे.
आमदार गिरीश महाजनांना
हायकोर्टाने फटकारले
विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला जनहित याचिकेद्वारे आव्हान देणारे भाजपा आमदार गिरीश महाजन यांना मुंबई हायकोर्टाने फटकारलं आहे. हायकोर्टाने गिरीश महाजन यांची याचिका फेटाळून लावली आहे. सोबतच जमा केलेले १० लाख जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. जनक व्यास यांच्यासह महाजन यांनी जनहित याचिका केली होती. कोर्टाने त्यांचीही जनहित याचिकाही फेटाळली असून दोन लाखांची अनामत रक्कम जप्त केली आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमबदलाने लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, असं महाजनांचं म्हणणे आहे. असं असेल तर राज्यपालांनी १२ नामनिर्देशित सदस्यांची अद्याप निवड केलेली नाही, मग हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे नाही का? असा प्रश्न कोर्टाने गिरीश महाजनांना विचारला
कीर्तनाच्या ठिकाणी मोबाईल
बंदी : इंदुरीकर महाराज
इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर टीका करताना वापरलेल्या शब्दांवरुन नवीन वाद निर्माण झाल्यानंतर आता यापुढे कीर्तनाच्या ठिकाणी मोबाईल बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे यापुढे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला जाणाऱ्यांना मोबाईल सोबत नेता येणार नाहीय. सोमवार आणि मंगळावर अशा सलग दोन दिवस मोबाईल न वापरण्यासंदर्भात कीर्तनादरम्यान वारंवार विनंती करुनही अगदी दम दिल्याप्राणे मोबाईल बंद करण्यास सांगावं लागल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय.
SD social media
9850 60 35 90