भारताचा माजी कर्णधार आणि अष्टपैलु क्रिकेटपटू विराट कोहली याची जगभरात लाखो चाहते आहेत. गेल्या काही काळापासून फॉर्म हरवलेल्या विराटने यंदाच्या विश्वचषकात जोरदार पुनरागमन केले. आपल्या उत्कृष्ट खेळीने त्याने सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. विराटच्या शानदार खेळीमुळेच भारताला पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध विजय प्राप्त झाला. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली. अशाच एका चाहत्याने विराटवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एक खास गोष्ट केली आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागातील एका चाहत्याने कोहलीच्या शानदार फलंदाजीचे कौतुक करण्यासाठी वाळूवर त्याची प्रतिमा तयार केली आहे. आर ए गद्दानी याने ही कलाकृती तयार केली असून आता याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याने ही कलाकृती तयार करतानाचा संपूर्ण व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने विराट कोहलीलाही टॅगही केलंय. त्याने विराटच्या प्रतिमेच्या वर लिहलंय, ‘आर ए गद्दानीकडून खूप प्रेम’.
पाकिस्तान विरुद्धच्या टी२० विश्वचषक सामन्यात, विराट कोहलीने नाबाद ८२ धावा करत भारताला चार गडी राखून विजय मिळवून दिला. विराटच्या या खेळीचे जगभरातून कौतुक झाले. कोहली आणि पंड्याने ११३ धावांची भक्कम भागीदारी केली. सामन्याच्या शेवटच्या षटकात हार्दिक ४० धावांवर बाद झाला. मात्र, कोहली सामना संपेपर्यंत नाबाद राहिला.
कोहलीने ५३ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांसह ८२ धावांची धमाकेदार खेळी खेळली. यानंतर नेदरलँड्सविरुद्धही त्याने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आणि आणखी एक अर्धशतक झळकावून भारताला शानदार विजय मिळवून दिला.