बच्चू कडू-रवी राणा वादात CM एकनाथ शिंदे करणार मध्यस्थी

दोघांनाही तातडीने ‘वर्षा’वर बोलावलं, आज तोडगा निघणार?

राज्यात एकीकडे शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष सुरु असताना दोन सत्ताधारी आमदार आमने-सामने आल्याने वाद पेटला आहे. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील संघर्षामुळे सत्ताधारी आमदारही चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान आता या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना ‘वर्षा’वर बोलावलं असून चर्चा करणार आहेत. त्यामुळे आज या वादावर तोडगा निघणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

रवी राणा मुंबईसाठी रवाना

रवी राणा मुंबईसाठी रवाना झाले असून मुंबई विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत. नेत्यांनी बोलावल्यानंतर जावं लागतं. म्हणूनच मी आज सकाळी ६ वाजता अमरावीतमधून निघालो असून ९.२५ च्या विमानाने मुंबईला जाणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

पण नेमका वाद काय?

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाक् युद्ध सुरू आहे. रवी राणांनी बच्चू कडूंवर केलेल्या आरोपानंतर या वादाला सुरुवात झाली. बच्चू कडू यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. यानंतर बच्चू कडू यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असून ‘येत्या १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्या, अन्यथा परिणामांची तयारी ठेवा’ असं आव्हानच दिलं आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात अचलपूर मतदार संघातील एका दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात रवी राणांनी बच्चू कडू यांना डिवचलं होतं. ‘मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या… हे या मतदार संघातल्या आमदाराचे ‘स्लोगन’ आहे,’ अशी टीका त्यांनी केली होती. मेळघाटातील धारणी येथेही त्यांनी बच्चू कडूंना पुन्हा डिवचले. त्याला प्रत्यूत्तर देताना बच्चू कडूंनी रवी राणांविषयी असंसदीय शब्दांचा वापर केला आणि त्यानंतर हा वाद चांगलाच वाढत गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.