ज्या कारणाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. सध्याचं जे गणित आहे ते चुकलेलं आहे. हे सुधारायचं असेल तर शिवसेना आणि भाजप एकत्रं आल्याशिवाय पर्याय नाहीच, असं रोखठोक मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं.
अभिनेते विक्रम गोखले यांनी मीडियाशी संवाद साधताना हे मत व्यक्त केलं. शिवसेना-भाजप एकत्र यावेत म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. तुमचं तरी काय बिघडलं असतं. ती चूक झाली. ज्यांना फॉलोअर्स असतील त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या आघाडीसाठी पुढाकार घाययला हवा, मी घेतोय पुढाकार, असं विक्रम गोखले म्हणाले. यावेळी त्यांनी एसटीच्या संपावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना-भाजप युतीबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलं होतं. दोन्ही पक्षांनी अडिच अडिच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? असा सवालही त्यांनी केला. एसटी महामंडळाचा मी ब्रँड अॅम्बेसिडर होतो. एअर इंडिया आणि एसटीला राजकारण्यांनी गाळात घातलं आहे, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना रणावतच्या वक्तव्याचं समर्थन केलं. कंगना जे म्हणाली ते खरं आहे. मी समर्थन करतो तिच्या वक्तव्याचे. कोणाच्या मदतीने हे स्वातंत्र्य मिळालं आहे? आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते. तेव्हा त्यांना फाशीपासून कोणी वाचवलं नाही. हे चुकीचं आहे, असं ते म्हणाले. मतपेट्यांचं राजकारण करणाऱ्यांमुळेच हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, दलित असा वाद होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी आर्यन प्रकरणावरही भाष्य केलं. मी अत्यंत स्पष्ट सांगतो. शाहरुख खान आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. देशाच्या बॉर्डरवर 21 वर्षाचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो. आर्यन हिरो नाही, असं त्यांनी सांगितलं.